Woman Labourer Death Electric Shock in Field
अमरावती : शेतात काम करताना विजेचा जोरदार धक्का लागल्याने महिला मजुराचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २५) अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दहिगांव रेचा शेतशिवारात उघडकीस आली. या घटनेनंतर नागरिकांनी महावितरण विरोधात आक्रोश व्यक्त केला. रूपाली शुद्धोधन सावळे (वय ३०) असे मृत महिलेचे नाव आहे. गावातील नागरिक व मजूर दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी महावितरण कार्यालयावर धडकल्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, दहिगाव रेचा येथील अनिल धुमाळे यांच्या शेतात गावातील दहा महिला मजूर निंदणासाठी आल्या होत्या. सर्व मजूर शेतामध्ये काम करत होते. त्यावेळी अचानक विजेचे तार तुटून शेतात पडले. या तारांचा स्पर्श रूपाली शुद्धोधन सावळे यांना झाला आणि त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. सोबत काम करणार्या महिला हे पाहून घाबरल्या.त्यांनी तत्काळ घटनेची माहिती शेत मालक आणि गावातील नागरिकांना दिली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तिथे पोहोचले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी ट्रॅक्टरमध्ये टाकून अंजनगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवला. या घटनेनंतर नागरिकांनी महावितरण विरोधात आक्रोश व्यक्त केला. पोलिसांनी मध्यस्थी करून या प्रकरणी जबाबदार महावितरण अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यावर नागरिक शांत झाले. रूपाली सावळे यांच्या मागे ९ वर्षाचा एक मुलगा आणि ७ वर्षाची एक मुलगी असा आप्त परिवार आहे. त्यांच्या अकस्मात जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.