Amravati Daryapur Road Accident Pudhari
अमरावती

Amravati Accident | नवी बुलेट घेऊन गावी परतताना काळाचा घाला! अमरावती-दर्यापूर मार्गावर ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू 

अकोला जिल्ह्यातील दोन तरुणांचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

Amravati Daryapur Road Accident

अमरावती : नवी दुचाकी (बुलेट) खरेदी करून  आनंदाने गावी परत जात असताना अमरावती-दर्यापूर मार्गावरील म्हैसपूर फाट्याजवळ भीषण अपघात घडला. भरधाव आयशर ट्रकने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील दोन तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी ११ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

संकेत गोपाल अवतीकर (वय २७, रा. बारलिंगा, ता. बाळापूर, जि. अकोला) आणि ऋषिकेश संजय म्हैसणे (रा. दहीगाव, ता. बाळापूर, जि. अकोला) अशी मृत पावलेल्या युवकांची नावे आहेत. हे दोघेही रविवारी अमरावती येथील एका शोरूममधून नवीन बुलेट दुचाकी खरेदी करण्यासाठी आले होते. शोरूममधील काम आटोपल्यानंतर दोघेही आनंदाने नवीन दुचाकीवरून खोलापूर मार्गे बाळापूरकडे जाण्यास निघाले होते.

दोघेही म्हैसपूर फाट्याजवळ आले असता, अमरावतीच्या दिशेने जाणार्‍या अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला. 

अपघाताची माहिती मिळताच खोलापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनूप वाकडे यांनी सहकार्‍यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी तात्काळ परिस्थिती हाताळत वाहतूक सुरळीत केली.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले आहेत. या प्रकरणी खोलापूर पोलीस पुढील तपास करत असून पसार झालेल्या ट्रक चालकाचा शोध घेतला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT