

अमरावती :३९ वर्षीय उच्चशिक्षित इंजिनिअर मुलाने कौटुंबिक वादातून आपल्या ६५ वर्षीय आईची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवसारी रिंग रोड परिसरातील गजानन प्लाझा अपार्टमेंटमध्ये ही घटना शनिवारी (दि.१०) घडली. रंजना सतीश कानफाडे असे मृत महिलेचे नाव असून, तुषार सतीश कानफाडे असे आरोपी मुलाचे नाव आहे.
तुषार हा पुण्यातील एका फ्रेंच बहुराष्ट्रीय कंपनीत आयटी इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. वर्क फ्रॉम होम सुविधा असल्यामुळे तो अमरावतीमध्ये घरीच राहत होता. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तुषार आणि त्याच्या आईमध्ये घरगुती कारणांवरून नेहमी वाद होत असत. आई खोटे बोलते किंवा आपल्याशी व्यवस्थित बोलत नाही, या क्षुल्लक कारणावरून शनिवारी सकाळी त्यांच्यात पुन्हा वाद झाला.
या वादाचे रूपांतर टोकाच्या हिंसेत झाले आणि तुषारने आईचा गळा आवळून हत्या केली. या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, आईचा जीव घेतल्यावर आरोपी तुषार पळून न जाता मृतदेहा शेजारीच खुर्चीवर शांत बसून राहिला. त्याने स्वतः गाडगेनगर पोलीस ठाण्यात जाऊन या हत्येची माहिती दिल्याचेही सांगण्यात आले.
माहिती मिळताच पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, गाडगे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव आणि गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपी तुषारला तात्काळ ताब्यात घेतले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला. उच्चशिक्षित आणि चांगल्या पगारावर काम करणार्या मुलानेच जन्मदात्या आईची हत्या केल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाने अमरावती शहर हादरले आहे. कुटुंबातील मतभेद आणि वाद इतक्या टोकाला पोहोचल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.