अमरावती : धारणी पासून सुमारे २५ किमी अंतरावर असलेल्या हरीसाल येथे वाघाने एका व्यक्तीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असून मृतदेह अर्धवट अवस्थेत जंगलात आढळून आला आहे. या घटनेनंतर वन विभागाकडून पंचनामा करण्यात आला आहे. मन्नू बाबला जावरकर असे वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
जंगलात लाकडे आणण्यासाठी गेलेल्या मन्नू यांच्यावर वाघाने हल्ला केला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. वाघाने मन्नूचे अर्धवट शरीर फस्त केले. घटनास्थळावर केवळ त्यांचे मुंडके मिळाले. दोन दिवसापासून ते घरून बेपत्ता होते. त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला होता. शेवटी बुधवारी ४ जून रोजी त्यांचा अर्धवट मृतदेह मिळाला. यामुळे गावांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
माहितीनुसार मन्नू जावरकर सोमवारी जळणासाठी लाकडे आणण्यासाठी शेवरीमुंडा येथील जंगलात गेले होते. मात्र संध्याकाळपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. दोन दिवस शोध घेतल्यानंतर देखील ते सापडले नाही. बुधवारी मन्नू यांच्या मुलांना शेवरीमुंडा जंगलात त्यांच्या वडिलांचे मुंडके दिसून आले. घटनास्थळी वाघाने हल्ला करून संपूर्ण शरीर फाडल्याचे आढळले.
वडिलांचे मुडंके पाहून घाबरलेल्या मुलाने तातडीने याबाबत गावांत व हरीसाल वनपरिक्षेत्र कार्यालयात माहिती दिली. माहिती मिळताच वनविभाग व पोलीस विभागाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे. धारणीचे ठाणेदार अशोक जाधव यांच्या नेतृत्वात पोलीस पथकही तेथे पोहोचले होते.
मागील काही दिवसांपासून मेळघाटात वाघाचे हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अन्न व पाण्याच्या शोधात असलेले वन्य प्राणी मानवी वस्ती कडे येतात तसेच हल्ले करतात. मागील दोन वर्षांत हरिसाल वनपरिक्षेत्राच्या जंगल क्षेत्रात चार वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांना वाघाने हल्ला करून ठार केले आहे. त्यामुळे या घटनेच्या पार्श्श्वभूमीवर घटनास्थळी मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी वनविभागाविरोधात प्रचंड रोष व्यक्त करीत वाघाला तत्काळ जेरबंद करण्याची मागणी केली. मेळघाटात सहजासहजी वाघाचे दर्शन होत नाही. मात्र अलीकडच्या काही वर्षांमध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात वाघांचा वावर वाढला आहे. मानव वन्यजीव संघर्ष वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. वनविभागाने या संदर्भात तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.