अमरावती : धावत्या सिटी बसचे अचानक ब्रेक झाल्याची घटना अमरावती शहरातील राजकमल चौकात घडली. ही घटना शनिवारी (दि.१४) दुपारी घडली. मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे ४० प्रवाशांचे प्राण वाचले. सिटी बस क्रमांक (एमएच २७ ए ९९ ३८) या क्रमांकाची बस शनिवारी १४ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता नवसारी वरून बडनेरा मार्गे जात होती. दरम्यान रेल्वे स्टेशन चौकावरून रेल्वे पूल मार्गे सिटी बस राजकमल चौकाकडे जात असताना अचानक सिटी बसचे ब्रेक फेल झाले. ही बाब चालक शेगोकार यांच्या लक्षात आली.
यानंतर चालकाच्या समय सूचकतेमुळे प्रवाशांचा जीव वाचविण्यासाठी मार्गावरील एका दुभाजकावर सिटी बस चढविली. बस दुभाजकावर चढताच थांबली. यावेळी राजकमल परिसरात मोठी गर्दी जमा झाली होती. कोतवाली पोलिसही घटनास्थळी पोहोचले. काही वेळासाठी वाहतूकही विस्कळीत झाली होती. मात्र चालकाने सर्व प्रसंग सांगितल्यावर सगळ्यांनी चालकाच्या समय सूचकतेचे कौतुक केले. चालकाने बस डिव्हायडरवर चढविली नसती तर मोठा अपघात होण्याची शक्यता होती.