

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा
कल्याण पूर्वेकडे असलेल्या पूना लिंक रोडला बुधवारी (दि.14) सायंकाळी डंपरचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला. ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर डंपरने समोर असलेल्या 5 वाहनांना धडक दिली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जिवितहाणी झालेली नाही. अपघातातील डंपर (एमएच 05 सीबी 9111) आणि चालकाला कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या अपघातामुळे परिसरात वाहतूक खोळंबली होती. स्थानिक पोलिसांसह वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गर्दी नियंत्रणात आणली. त्यानंतर अपघातग्रस्त वाहनांना डंपरपासून विलग करण्यात आले. या अपघातात 5 वाहनांचे मात्र मोठे नुकसान झाले. या वाहनांमध्ये ऑक्सिजन सिलेंडर भरलेल्या ट्रकसह टेम्पो, कार, रिक्षाचा समावेश आहे. कोळसेवाडी पोलिस या घटनेची अधिक माहिती घेत आहेत.