अमरावती

MSRTC bus theft : नागपूरहून चोरीस गेलेली शिवाई बस अमरावतीत जप्त ; आंतरराज्यीय बसचोर गजाआड 

तेलंगणा, आंध्रप्रदेशसह अनेक भागातून २० बसेसची चोरी

पुढारी वृत्तसेवा

अमरावती : नागपूरच्या इमामवाडा बसस्थानकातून चोरीस गेलेली तब्बल दीड कोटी रुपयांची शिवशाही बस शोधून काढत राजापेठ पोलिसांनी एका आंतरराज्यीय वाहनचोराला अटक केली आहे. विशेष म्हणजे आरोपीने तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्रातील विविध भागांतून सुमारे २० बस चोरी केल्याची धक्कादायक कबुली (दि.२) पोलिसांसमोर दिली आहे.

राजापेठ पोलीस ठाण्याचे बीट मार्शल सारंग अदमणे व विजय धुर्वे यांना गुप्त माहिती मिळाली की, नागपूरच्या इमामवाडा बसस्थानकातून चोरीस गेलेली शिवाई बस (क्र. एमएच-४९ बीझेड-८२५८) ही अमरावतीतील नंदा मार्केट परिसरात उभी आहे. तसेच बस चोरणारा संशयित गद्रे चौक परिसरात फिरत असल्याची माहिती मिळताच बीट मार्शल व राजापेठ डीबी पथकाने तातडीने सापळा रचला.

पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव विष्णू गणपती नीलावर (वय २३, रा. हईत नगर, जिल्हा रंगारेड्डी, तेलंगणा) असे सांगितले. अधिक चौकशीत त्याने १ जुलैच्या मध्यरात्री इमामवाडा बसस्थानकातून ही बस चोरी केल्याची कबुली दिली. चौकशीदरम्यान आरोपीने आणखी अनेक धक्कादायक खुलासे केले. तेलंगणा, हैदराबाद आणि आंध्रप्रदेश परिसरातून सुमारे २० बस चोरी केल्याचे त्याने सांगितले. नांदेड बस डेपोतूनही एक बस चोरी केल्याची कबुली त्याने दिली.

या प्रकरणी नांदेडच्या वजीराबाद पोलीस ठाण्यात तसेच आंध्रप्रदेशातील तिरुमला क्राईम पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध वाहन चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या तपासात आरोपीची कार्यपद्धतीही उघड झाली. चोरी केलेल्या बसमधील बॅटरी, टायर आणि डिस्क यांसारखे महागडे सुटे भाग काढून त्यांची विक्री करणे, तर उर्वरित वाहन निर्जनस्थळी सोडून देणे, अशी त्याची पद्धत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. राजापेठ पोलिसांनी आरोपीकडून अंदाजे १ कोटी ५३ लाख रुपये किमतीची शिवाई ई बस जप्त केली आहे. या बस चोरीप्रकरणी नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी गणेशपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. 

ही कारवाई अमरावती पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे आणि सहायक पोलीस आयुक्त संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) उमेश मुंडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे, डीबी पथक, बीट मार्शल सारंग आदमणे, विजय धुर्वे व इतर पोलीस कर्मचार्‍यांनी ही यशस्वी कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT