Melghat Rare Wildlife Sighting
अमरावती : वन्यजीव अभ्यासकांनाही थक्क करणारा प्रसंग मेळघाटच्या जंगलात नोंदवला गेला आहे. सहसा वेगवेगळ्या अधिवासात आढळणारे भारतीय राखाडी लांडगा आणि ढोल (आशियाई रानकुत्रा) हे दोन ‘कॅनिड’ प्राणी एकत्र, तेही पूर्ण शांततेत फिरताना दिसले. विशेष म्हणजे या गटाचे नेतृत्व एका प्रौढ लांडग्याकडे असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पच्या बफर क्षेत्रात ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक व मानद वन्यजीव रक्षक डॉ. सावन देशमुख यांनी भारतीय राखाडी लांडगा आणि चार ढोल यांचा समन्वयाने फिरणारा गट जवळपास ४० मिनिटे पाहिला. या काळात कोणतीही गुरगुर, झेप किंवा वर्चस्वासाठी संघर्षाचे संकेत आढळले नाहीत.
लांडगा प्रामुख्याने मोकळी गवताळ कुरणे, शुष्क माळराने व कृषी-पशुपालक भागात आढळतो; तर ढोल दाट पानझडी व सदाहरित जंगलात कळपाने वास्तव्य करतो. त्यामुळे या दोन मोठ्या सामाजिक ‘कॅनिड’ प्रजातींचा असा मैत्रीपूर्ण सहवास दुर्मीळ मानला जातो. भारतीय वन्यजीव अभ्यासात ही केवळ तिसरी नोंद असल्याचे सांगितले जाते. मेळघाटात मात्र ही पहिलीच घटना ठरली आहे.
निरीक्षणातील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे प्रौढ लांडगा गटाच्या अग्रभागी राहून हालचालींना दिशा देत असल्याचे स्पष्ट दिसले. ढोलांच्या कळपात ठरावीक सामाजिक शिस्त असते; अशा वेळी दुसर्या प्रजातीचा सदस्य पुढे असणे ही अत्यंत दुर्मिळ बाब मानली जाते. डॉ. देशमुख यांनी या घटनेची सविस्तर नोंद ठेवली असून तज्ज्ञांशी चर्चा सुरू केली आहे.
आंतरप्रजाती वर्तन, अधिवासातील बदल आणि पर्यावरणीय दडपण या संदर्भात ही घटना नवे प्रश्न उपस्थित करते. या निरीक्षणावर आधारित संशोधन निबंध आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध करण्याची तयारीही सुरू आहे.
मेळघाटच्या समृद्ध जैवविविधतेतून समोर आलेली ही घटना केवळ ‘अनोखी जोडी’ नसून, परिसंस्थेतील संतुलन आणि सहअस्तित्वाची जिवंत साक्ष ठरत आहे.