अमरावती, पुढारी वृत्तसेवा: मी सुद्धा लोकसभेला निवडून आलो. मात्र मी लोकांना सांगितलं की,माझ्या हिशोबाने राजकारण चालेल. तुमच्या हिशोबाने नाही. तुम्हाला मत द्यायचं असेल तर द्या नाही दिलं तरी चालेल. जो देईल त्याचेही काम करेल आणि जो नाही देईल त्याचेही काम करेल. जनता जातीवादी नाही तर राजकारणी जातीवादी आहेत. ते आपल्या स्वार्थाकरिता जात उभी करतात, असे परखड मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर व्यक्त केले.
ते अमरावतीत शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित पुरस्कार समारंभात शनिवारी (दि.२२) बोलत होते. गडकरी यांना डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला शरद पवार हे आभासी पद्धतीने उपस्थित होते तसेच खासदार बळवंत वानखडे, आमदार संजय खोडके,आमदार सुलभा खोडके, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना गडकरी म्हणाले,माणूस हा जातीने मोठा नाही तर गुणाने मोठा आहे. या समाजातील अस्पृश्यता समूळ नष्ट झाली पाहिजे. कमीत कमी मी तरी माझ्या व्यवहारात ती ठेवता कामा नये, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
जे जे चांगलं त्याला आपण मदत केली पाहिजे. जे काही समाज उपयोगी आहे, त्याला आपण मदत केली पाहिजे, अशा प्रकारची संवेदनशीलता सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेतृत्वांच्या स्थायी असणे ही देखील लोकशाहीची आणि समाजाची सगळ्यात मोठी आवश्यकता आहे. राजकारण म्हणजे केवळ पाच वर्षाची निवडणूक नाही. दुर्भाग्याने आज प्रत्येकाला तिकीट पाहिजे. मी देखील अनेक सत्कारांच्या कार्यक्रमाला जातो. मात्र प्रत्येकच कार्यक्रमात सत्कार केल्यावर आनंद मिळतोच असे नाही, असेही गडकरी म्हणाले.
मी फार विद्वान नाही. मी फार प्रॅक्टिकल आणि जेवढं जवळून बघितलं तेवढेच बोलतो. मला यापुढे व्यवसायही करायचा नाही, जेवढे व्यवसाय केले ते घाट्याचे केले. पण माझ्या मुलाने फायद्याचे केले. कारण माझी मुलं राजकारणात नाही. माझ्या मुलाला एकदा युवा मोर्चाचे अध्यक्ष करायचे आहे, असे सांगण्यात आले. मात्र, मी म्हणालो,आधी माझा राजीनामा घ्या आणि नंतर माझ्या मुलाला अध्यक्ष करा. माझा मुलगा म्हणून त्याला राजकारणात स्थान मिळायला नको, त्याच्या कर्तृत्वाने त्याने स्थान निर्माण करावं असं मी त्यांना सांगितलं. आमदाराच्या पोटातून आमदार आणि खासदाराच्या पोटातून खासदार व्हायला नको. कुणाचा मुलगा-मुलगी असणे गुन्हा नाही. मात्र त्यांनी आधी त्यांचे कर्तृत्व सिद्ध करावे, असेही गडकरी म्हणाले.
आपल्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये राजकारणाचा अर्थ समाजकारण आहे. ते सामाजिक आर्थिक परिवर्तनाचे साधन आहे. पुढारी आपल्या स्वार्थाकरिता जात उभी करतात. मात्र माणूस हा जातीने मोठा नाही तर गुणाने मोठा आहे. या समाजातील जातीयता अस्पृश्यता समूळ नष्ट झाली पाहिजे. कमीत कमी मी तरी माझ्या व्यवहारात ती ठेवता कामा नये. या दोन गोष्टी झाल्या तर हळूहळू समाज बदलणार आहे, असा आशावाद गडकरी यांनी व्यक्त केला.