

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : वेतनाचे पैसे न मिळाल्याने दोघांनी चक्क कार शोरूमच्या सीईओचे अपहरण केले. मात्र राजापेठ पोलिसांनी तत्काळ दखल घेत आरोपींचा पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले. त्यामुळे पुढील अनुचीत प्रकार टळला. आनंद सुरेश ओगले (वय ३०, रा. यशोदा नगर गल्ली क्रमांक ३, अमरावती) आणि अक्षय सुधीर खुडे (वय ३१, रा. किरण नगर गल्ली क्रमांक ९, अमरावती) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. अपहरण झालेल्या सीईओचे नाव मोहम्मद शरीफ शाहिद खान (वय ५५, रा. नागपूर) असे आहे.
मोहम्मद शरीफ हे बडनेरा रोडवरील एका कार शोरूममध्ये सीईओ म्हणून काम करतात. गुरुवारी (दि.२०) दुपारी आनंद आणि अक्षय हे दोघेही शोरूममध्ये आले. त्यांनी चाकू दाखवून मोहम्मद शरीफ यांना पैशाची मागणी केली. मात्र तेव्हा त्यांना पैसे मिळाले नाहीत, त्यामुळे त्यांनी सीईओ मोहम्मद शरीफ यांचे अपहरण केले आणि परिसरात ठेवलेल्या कारमध्ये त्यांना सोबत घेऊन बडनेरा येथे निघून गेले.
याबाबतची माहिती शोरूमच्या कर्मचार्यांनी तात्काळ राजापेठ पोलिसांना दिली. त्यानंतर राजापेठ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. त्यानंतर अपहरणकर्त्यांचा पाठलाग सुरू केला. शोरूममधून बाहेर गेलेली अपहरणकर्त्यांची ती गाडी बडनेरा रोडवरील एका बारजवळ उभी असलेली दिसली. पोलीस तेथे पोहोचले. पोलिसांना पाहून आरोपींनी तेथून पळ काढला. मात्र, पोलिसांनी फिल्मी स्टाईलने अपहरणकर्त्यांच्या वाहनाचा पाठलाग करून दोघा अपहरणकर्त्यांना अटक केली. तसेच कार शोरूमचे सीईओ शरीफ यांची सुटका केली.
दोन्ही अपहरणकर्त्यांना राजापेठ पोलिस ठाण्यात आणण्यात आले. जिथे त्यांनी सांगितले की, पगार न मिळाल्यामुळे आम्हे हे कृत्य केले. याप्रकरणात राजापेठ पोलिसांनी अक्षय आणि आनंदविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.