अमरावती बसस्थानक परिसरातील अंबिका हॉटेलचे संचालक मनोज रमेशचंद्र जयस्वाल (वय ५३) यांचा समृद्धी महामार्गावर मेहकर जवळ अपघातात मृत्यू झाला.  (Pudhari Photo)
अमरावती

मुलीच्या विवाहाची पत्रिका घेऊन गेलेल्या वडिलांवर काळाचा घाला

Samruddhi Mahamarg Accident | समृद्धी महामार्गावर मेहकरजवळ अपघात, मनोज जयस्वाल यांचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : अमरावती बसस्थानक परिसरातील अंबिका हॉटेलचे संचालक मनोज रमेशचंद्र जयस्वाल (वय ५३) यांचा समृद्धी महामार्गावर मेहकर जवळ सोमवारी अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या मुलीच्या विवाहाची पत्रिका देवी तुळजाभवानीला अर्पित करण्यासाठी ते पत्नी आणि मुलासह अमरावतीवरून गेले होते. दरम्यान, समृद्धी महामार्गावरून जात असताना त्यांना डुलकी आल्यामुळे अपघात झाला. यात रमेशचंद्र जयस्वाल यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर मंगळवारी (दि.२१) अमरावतीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी आणि समाजाने शोक व्यक्त केला.

अधिक माहितीनुसार, कुलदैवत तुळजाभवानीला अर्पित करण्यासाठी जयस्वाल कुटुंबीय मुलीच्या लग्नाची पत्रिका घेऊन गेले होते. तिथून दर्शनानंतर परत येत असताना मेहकर जवळ मलकापूर पांगरा समृद्धी महामार्गावर चॅनल क्रमांक २७६ जवळ त्यांच्या कारचा अपघात झाला. यावेळी स्वतः जयस्वाल हे गाडी चालवत होते. त्यांना डुलकी लागल्याने अथवा गाडीचे स्टेअरिंग लॉक झाल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.

या अपघातात मनोज जयस्वाल गंभीररीत्या जखमी झाले होते. तर त्यांची पत्नी आणि मुलगा थोडक्यात बचावले. या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी अपघातानंतर मनोज जयस्वाल यांना रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना मेहकर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तेथून त्यांना अकोला येथे पाठवण्यात आले. तेथे उपचारादरम्यान मनोज जयस्वाल यांचा मृत्यू झाला. अकोला येथे पोस्टमार्टम करून मंगळवारी त्यांचा मृतदेह अमरावतीत आणण्यात आला. येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलीच्या विवाहपूर्वीच वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबासह समाजमन हळहळले. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा मोठा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT