

अमरावती, पुढारी वृत्तसेवा
अमरावती वरून नागपूरकडे जाणार्या भरधाव चारचाकी कारचे संतुलन बिघडल्याने ती कार थेट महामार्गारील एका घरात शिरली. हा अपघात रविवारी (दि.१९) हा बोरगाव धर्माळे जवळ झाला. घटनेत एक जण गंभीर असल्याची माहिती आहे. अपघातानंतर कारने पेट घेतल्याने कारची राखरांगोळी झाली. दरम्यान या घटनेने महामार्गालगत अतिक्रमण करून राहणार्या रहिवाशांनी आक्रोश करत महामार्गावर चक्काजाम केला. घटनेची माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चारचाकी वाहन क्र.एम एच१४,सीएस ९१६१ रविवारी सकाळी अमरावती वरून भरधाव वेगाने नागपूरकडे जात होते. बोरगाव धर्माळे नजीक भारत पेट्रोलपंपाजवळ अचानक कारचे संतुलन बिघडले. त्यामुळे कार थेट महामार्गालगत असलेल्या झोपडीमध्ये शिरली. कारची धडक एवढी भीषण होती की, कडेला असलेले कडूनिंबाचे झाड देखील कोसळले. यानंतर कारने पेट घेतला. दरम्यान कारचा चालक फरार झाला. यामध्ये रस्त्यावर कुल्फी विकणार्या राजू कुशवाह (वय ४५, रा.बेलपुरा) यांना वाहनाची धडक लागल्याने ते गंभीर जखमी झाले. डोक्याला इजा झाल्याने त्यांना तातडीने नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेनंतर महामार्गाच्या कडेला राहणार्या सर्व अतिक्रमणधारक नागरिकांनी रस्ता रोको केला. महामार्गावर आम्हाला नाईलाजाने आणि जीव मुठीत घेऊन राहावे लागते. अशा घटना वारंवार घडतात, आमची जीवितहानी होऊ शकते, त्यामुळे शासनाने आम्हाला जागा देऊन घरकुल मंजूर करावे अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र अंभोरे आपल्या पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले होते. आंदोलनकर्त्यांची समजूत काढुन त्यांना घरी पाठविण्यात आले.