अमरावतीः गेल्या दहा वर्षांपासून फरार असलेला आणि शंभरहून अधिक गंभीर गुन्ह्यांत सहभागी असलेला कुख्यात गुन्हेगार अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. अकोला येथून त्याला अटक करण्यात राजापेठ पोलिस ठाण्याच्या वारंट पथकाला यश आले. अब्दुल रशीद ऊर्फ तलवारसिंह अब्दुल हमीद (रा. नायगाव, मेहबुबिया मशिदीजवळ, अकोला) असे या आरोपीचे नाव आहे. चोरी, दरोडा, खून आणि खुनाचा प्रयत्न यासारख्या गुन्ह्यांत तो सहभागी आहे. त्याच्यावर वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, अमरावती आणि रेल्वे पोलिस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पोलीस सूत्रानुसार, अब्दुल रशीद हा अत्यंत चलाख असून, तो सतत ठिकाण बदलत असल्याने पोलिसांना अटक करणे कठीण झाले होते. गेल्या दहा वर्षांत तो एकदाही न्यायालयात हजर झाला नव्हता. त्यामुळे विविध न्यायालयांनी त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. काही प्रकरणांत न्यायालयाने त्याला फरार जाहीर केले होते. राजापेठ पोलिसांना विश्वसनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, आरोपी १६ जुलै रोजी नायगाव परिसरात फिरत आहे. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी आशिष विघे, विक्रम देशमुख, जगदीश वानखडे, सतीश टपके, आबिद शेख, पूजा चंदनपत्री आणि विजय यादव यांच्या पथकाने अकोला गाठले आणि सापळा रचून त्याला अटक केली. आरोपीला अमरावतीतील राजापेठ पोलिस ठाण्यात हजर करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
आरोपी गेल्या १० वर्षापासून न्यायालयात हजर राहत नसल्यामुळे न्यायालयाने त्याला फरार घोषित केले होते. राजापेठ पोलिसांनी या मोस्ट वॉन्टेड आरोपीला अटक केली आहे. आरोपी तलवार सिंग यांच्यावर महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये चोरी,जबरी चोरी, दरोडा,खून यासारखे शेकडो गुन्हे दाखल आहेत.