अमरावती : पश्चिम बंगालमध्ये टीएमसी आमदार हुमायून कबीर यांनी मुर्शिदाबाद मध्ये बाबरी मस्जिद बांधण्याचा संकल्प केल्यानंतर त्याचे संपूर्ण देशात पडसाद उमटले. दरम्यान भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी देखील त्यावर आपली तीव्र प्रतिक्रिया समाज माध्यमांवर दिली आहे.
'मी बंगालला बांगलादेश बनू देणार नाही. बाबरी च्या नावावर एक वीट जरी रचली तर मी बंगालमध्ये येऊन ती उखडून टाकेल. मी बंगाल मध्ये येत आहे'. अशा शब्दात नवनीत राणा यांनी इशारा दिला आहे.
पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायून कबीर यांनी बाबरी मज्जिद उभारण्याच्या केलेल्या घोषणेनंतर आणि या संदर्भातच केलेल्या वक्तव्यावरून देशभरात राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांनी केलेल्या सोशल मीडियावरील वक्तव्यामुळे नवी चर्चा रंगू लागली आहे.
दरम्यान यापूर्वी नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नवनीत राणा यांनी बाबरी, औरंगजेब आदींचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही टीका केली होती.
नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रखर हिंदूत्वाचा स्वीकार केला आहे. एक कडवट हिंदू नेतृत्व म्हणून त्या आपली प्रतिमा तयार करत आहे. त्यासाठी पक्षाकडूनही त्यांना पाठबळ मिळत आहे. त्यामुळेच त्यांना हैदराबादमध्ये ओवेसी यांच्या गडात भाजपने प्रचारासाठी पाठविले होते. हनुमान चालीसा प्रकरणावरून त्यांनी संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते. आता त्या थेट पश्चिम बंगालमध्ये जावून ममता बॅनर्जींनाच चॅलेंज करणार का, असा सवाल त्यांच्या सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे उपस्थित होत आहे.