बडनेरा रेल्वे स्टेशन टाकीजवळ आढळला तरुणीचा विवस्त्र मृतदेह  Pudhari Photo
अमरावती

बडनेरा रेल्वे स्टेशन टाकीजवळ आढळला तरुणीचा विवस्त्र मृतदेह

पुढारी वृत्तसेवा

अमरावती : शहरातील बडनेरा रेल्वे स्थानकामागील पाण्याच्या टाकीजवळ एका ३५ वर्षीय तरुणीचा विवस्त्र मृतदेह आढळून आल्याने मंगळवारी (दि.१५) एकच खळबळ उडाली आहे. मृतदेहाजवळ रक्ताचे डाग दिसून आले असून चेह-यावर व शरीरावर जखमा आहेत. त्यामुळे तरुणीचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बडनेरा रेल्वे स्थानकामागील पार्किंगजवळ पाण्याच्या टाकीखाली एक खोली बांधण्यात आली आहे. या खोलीजवळ एका अनोळखी मुलीचा मृतदेह जमिनीवर आढळून आला. तिचा मृतदेह विवस्त्र होता. या घटनेची माहिती परिसरातील लोकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलिस आणि बडनेरा पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. तरुणीचा खून झाल्याची चर्चा परिसरात रंगली होती. या घटनेच्या अनुषंगाने पोलिसांच्या तिन्ही पथकांनी तपास सुरू केला आहे. मृतक तरुणीचे वय अंदाजे ३५ वर्षे आहे. पोलिसांनी तरुणीची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शवविच्छेदनातून खरे कारण समोर येणार आहे. मात्र रात्रभर रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांची वर्दळ असतानाही ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मुलीची ओळख अद्याप पटली नाही. ती अनोळखी आहे. मृतदेहाजवळ रक्ताचे डाग दिसून आले. शवविच्छेदनानंतर तिच्या मृत्यूचे खरे कारण पुढे येईल. पोलिस यंत्रणा मुलीची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. बडनेरा व क्राईम ब्रँचची टिम तपास करीत आहे.
सागर पाटील, पोलिस उपायुक्त, अमरावती

पाणाच्या टाकीवरून पडल्याचा अंदाज

प्राथमिक तपासात तरुणीचा पाण्याच्या टाकीवरून पळून मृत्यू झाल्याचा देखील अंदाज व्यक्त केला जात आहे. जवळील पारधी समाजाच्या बेड्यात तरुणीबद्दल विचारपूस करण्यात आली होती. मात्र तिथे देखील तिला कोणीच ओळखत नव्हते. त्यामुळे तिची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहे. प्रकरणाचे गांभीर्य पाहून डीसीपी सागर पाटील, एसीपी कैलास पुंडकर यांनी घटनास्थळाचे निरीक्षण केले आणि आवश्यक दिशा-निर्देश अधिनस्त पोलिस कर्मचार्‍यांना दिले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT