Charging Mobile Blast
अमरावती : जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जीमधील साईधाम नगर येथे एका घरी चार्जिंगला लावलेल्या मोबाईलमध्ये स्फोट झाल्याची धक्कादायक घटना (दि.३० रोजी) समोर आली आहे. येथील रहिवासी संजय टाले यांचा मोबाईल चार्ज करण्यासाठी लावला असताना एकाएकी मोबाईलचा स्फोट झाला.
स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की त्यांच्या घरात कंपन निर्माण झाले होते. त्या आवाजाने त्यांची पत्नी हॉलमध्ये आली असताना मोबाईलला आग लागलेली दिसली. तसेच बाजूच्या कपड्यांनी सुद्धा लगेच पेट घेतला होता. तत्काळ त्यांनी प्लग बंद करून मोबाईल वर पाणी टाकले. त्यांच्या पत्नीच्या सतर्कतेने मोठी हानी टळली. अन्यथा त्यांच्या बेडरूमध्ये आग लागली असती. सुदैवाने ही घटना घडली तेव्हा बेडरूम मध्ये कोणी नव्हते किंवा तो मोबाईल कोणाच्या हातात नव्हता. अन्यथा खूप मोठी हानी झाली असती.
मोबाईलच्या ब्लास्टचा आवाज खुप मोठा होता. आमचे घर थोडक्यात बचावले, माझ्या पत्नीने जर तात्काळ समयसूचकता दाखविली नसती तर खूप मोठी हानी झाली असती. आम्ही स्वतः मोबाईल ब्लास्ट कसा होतो हे अनुभवले आहे. त्यामुळे आपण कुणीही चार्जिंग लावून मोबाईल हाताळू नये व विशेष करून मोबाईल लहान मुलांना देऊ नये,असे संजय टाले यांनी याघटनेनंतर म्हणाले.