

Young Girl Life Ends in Khoni Dombivli
डोंबिवली : अभ्यासाकडे लक्ष दे, मोबाईल जास्त बघू नकोस, एवढे मामाचे बोलणे मनाला लागलेल्या भाचीने टोकाचा निर्णय घेतल्याची घटना मंगळवारी (दि.२९) रात्रीच्या सुमारास २७ गावांपैकी असलेल्या खोणी गावात घडली. मामाने आपला मोबाईल काढून घेतला म्हणून रागाच्या भरात एका महाविद्यालयीन तरूणीने इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपविले. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद केली आहे. समीक्षा नारायण वड्डी (वय २०) असे मरण पावलेल्या तरूणीचे नाव असून ती महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. ही तरूणी काटई-बदलापूर पाईपलाईन रोडला असलेल्या खोणी गावातील फिफ्टी/फिफ्टी ढाब्याजवळ असलेल्या बहुमजली इमारतीत राहणाऱ्या मामाच्या घरी राहत होती.
या संदर्भात गणेश प्रधान यांनी मानपाडा पोलिसांना तशी माहिती दिली. या माहितीवरून पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद केली आहे. गणेश प्रधान यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, समीक्षा वड्डी ही आपली भाची आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास ती मोबाईलवर बोलत होती. यावेळी समीक्षाच्या हातातील मोबाईल मामा गणेश प्रधान यांनी काढून घेतला. तिने अभ्यास करावा, सतत मोबाईलचा वापर करू नये, असा मामाचा चांगला दृष्टीकोन होता, असे पोलिसांनी सांगितले.
मोबाईलवर बोलत असतानाच मामाने आपल्या हातातील मोबाईल काढून घेतल्याच्या रागातून समीक्षा घरात कुणाला काहीही न सांगता हॉलच्या खिडकीत गेली. तेथून तिने अकराव्या मजल्यावरून उडी मारली. समीक्षा जमिनीवर आदळताच मोठा आवाज झाला. कुटुंबीयांनी तत्काळ इमारतीच्या तळमजल्याला धाव घेतली. सोसायटीमधील इतर रहिवासी मदतीसाठी धावून आले. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या समीक्षाला उचलून तत्काळ जवळच्या खासगी रूग्णालयात नेण्यात आले. तथापी उपचार सुरू करण्यापूर्वीच समीक्षा मृत असल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.
भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलमांन्वये पोलिसांनी या घटनेची नोंद करून घेतली आहे. या घटनेची माहिती कळताच पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुंड, सहाय्यक पोलिस निरीक्षक संपत फडोळ, पोलिस उपनिरीक्षक गणेश भाबड यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रकरणाची माहिती घेतली. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक गणेश भाबड अधिक तपास करत आहेत.