Shivangaon mild tremors
अमरावती : जिल्ह्यात तिवसा तालुक्यातील शिवणगाव-फत्तेपूर परिसरात पुन्हा एकदा भूकंपसदृश्य सौम्य धक्के रविवारी (दि.२४) रात्री ११.३० ते ११.४५ या वेळेत सलग धक्के जाणवले; मात्र यांची नोंद भूमापक यंत्रावर झाली नसल्याने धक्क्यांचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही घरांतील भांडीसुद्धा पडल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. यापूर्वीही अशाच प्रकारचे हलके धक्के बसल्यामुळे गावकरी चिंताग्रस्त असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच तिवसा तहसीलदार मयुर कळसे, प्रशासकीय यंत्रणा तसेच तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांनी मध्यरात्री गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. सोमवारी सकाळी आमदार राजेश वानखडे आणि खासदार बळवंत वानखडे यांनीही शिवणगावला भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली तसेच तातडीने तपास यंत्रणा कार्यरत करण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान, या धक्क्यांबाबत अधिक शास्त्रीय मार्गदर्शनासाठी २६ नोव्हेंबर रोजी गावात विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी संभाजीनगर येथील एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल-अंतराळ केंद्राचे संचालक श्रीनिवास औधकर गावाला भेट देऊन नागरिकांशी चर्चा करणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी दिली.