अमरावती : मेळघाटातील कुपोषण व माता-बाल मृत्यूचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. येथे कोट्यवधी रुपये खर्चूनही आरोग्य यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. धारणी तालुक्यातील हरीसाल गावात एकाच वेळी माता व बालमृत्यूच्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
हरीसाल येथील रूपाली अजय धांडे (वय २०) या नवविवाहितेने मृत बाळाला जन्म दिल्यानंतर तिचाही उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, रूपाली सात महिन्यांची गरोदर होती. शुक्रवारी ३ ऑक्टोबरच्या रात्री अचानक तिला प्रसूतीवेदना सुरू झाल्या. पहाटे ३.३० वाजता घरातच तिची प्रसूती झाली. दुर्दैवाने बाळ मृत जन्मले.
प्रसुतीनंतर रूपालीची प्रकृती खालावली. नातेवाईकांनी तिला तत्काळ हरीसाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने तिला धारणी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे तिला ऑक्सिजन देण्यात आला व उपचार सुरू झाले. मात्र, उपचारादरम्यानच काही वेळात रूपालीने अखेरचा श्वास घेतला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, याआधीही रूपालीचा तीन महिन्यांचा गर्भपात झाला होता. या घटनेमुळे तिच्या शरीरावर परिणाम झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे मेळघाटातील आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रुग्णालयासारख्या ठिकाणी जिथे गर्भवती महिलांची योग्य देखभाल, वेळेवर वैद्यकीय मदत आणि प्रसूतीसाठी आवश्यक सुविधा मिळाव्यात, त्या ठिकाणी अजूनही महिलांना मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. धारणीसह मेळघाटात सरकारकडून कुपोषण व माता-बाल मृत्यू रोखण्यासाठी विविध योजना राबवल्या जात असल्या तरी त्याचा लाभ प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहोचत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. मेळघाटातील माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे सरकारी आकडेवारीतून दाखविण्यात येत असले तरी प्रत्यक्ष स्थिती त्यापेक्षा वेगळी आहे.