मेळघाटातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी उपाययोजना करणार : आरोग्यमंत्री आबिटकर

Amaravati News | आरोग्‍यमंत्र्यांचा पाहणी दौरा
Amaravati News
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मेळघाटात पाहणी दौरा केला. Pudhari Photo
Published on
Updated on

अमरावती : मेळघाटात दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण आरोग्य केंद्रांना भेटी देऊन नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेण्यात आल्या. येत्या काळात मेळघाटात आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, असे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी (दि.२४) सांगितले.

मेळघाटातील आरोग्य यंत्रणांची पाहणी करण्यासाठी मंत्री आबिटकर यांनी सोमवारी दौरा केला. यादरम्यान ते बोलत होते. आमदार केवलराम काळे, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, उपसंचालक डॉ. कमलेश भंडारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, तहसीलदार जीवन मोरनकर, गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकळे, सहायक संचालक भारती कुलवाल आदी यावेळी उपस्थित होते.

मेळघाटात आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जातील. इतर ठिकाणी ज्या सुविधा नागरिकांना मिळतात तशाच सुविधा मेळघाटतही तयार करण्यावर भर देण्यात येईल. अचलपूर येथील ग्रामीण रुग्णालय हे या भागात महत्त्वाचे असल्यामुळे या ठिकाणी सुविधा वाढविण्यात येतील. आरोग्य यंत्रणेने सकारात्मक राहून नागरिकांना सुविधा पुरवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान मंत्री आबिटकर यांनी सकाळी हतरू प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. केंद्रातील आंतररुग्ण कक्षातील रुग्णांकडून माहिती घेऊन संवाद साधला. तसेच प्रयोगशाळा, औषध भांडार आदींची पाहणी केली. यावेळी त्यांनी कार्यरत कर्मचार्‍यांची देखील चौकशी केली. चुरणी येथील ग्रामीण रुग्णालयात आबिटकर यांनी औषधी विभाग, आंतररुग्ण कक्ष, प्रसूतिगृह, शस्त्रक्रिया गृह, रक्तसाठा केंद्र, एक्स-रे केंद्राची पाहणी केली.

नागरिकांच्या समस्या आरोग्य यंत्रणांनी जाणून घेत त्यानुसार सुधारणा करावी. रुग्णालयात प्रामुख्याने ग्रामीण आणि गरजू रुग्ण येत असल्याने त्याला दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. हिरडा येथील अंगणवाडी केंद्राला त्यांनी भेट दिली. याठिकाणी ४७ बालके असून यातील एकही बालक कुपोषित नसल्याबद्दल कर्मचार्‍यांचे त्यांनी कौतुक केले. तसेच येत्या काळात चांगले कार्य करावे. बालकांचे पोषण होण्यासाठी त्यांना आणि मातांना सकस आहार पुरविण्यात यावा, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी लाभार्थ्यांना गोल्डन कार्डचे वितरण करण्यात आले.

बोरुगव्हाण येथील ग्रामपंचायत कार्यालयाला आबीटकर यांनी भेट दिली. येथे प्रामुख्याने रस्ते आणि आरोग्य विषयक सुविधा पुरविण्यासाठी मदत करण्यात येईल, असे ते म्हणाले. दौर्‍यादरम्यान आबीटकर यांनी नागरिक, संस्था आणि संघटना त्यांच्याकडून निवेदने आणि तक्रारी स्वीकारल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news