अमरावती; पुढारी वृत्तसेवा : येथील मध्यवर्ती कारागृहात दोन गटातील कैद्यांमध्ये गँगवार झाल्याची घटना शुक्रवारी (दि.२९) उघडकीस आली. कैद्यांच्या दोन गटात हाणामारी होताना मध्यस्थी करण्यासाठी तुरूंगातील अधिकारी व कर्मचारी गेले होते. त्यावेळी त्यांच्यावरही या कैद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एका अधिकाऱ्यासह पाच कर्मचारी जखमी झाले आहेत. कारागृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कैद्यांच्या गटातील एका कैद्याने पत्र्याच्या साहाय्याने प्राणघातक हल्ला केला. त्यामुळे आमरावती मध्यवर्ती कारागृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेलाच धोका निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती मध्यवर्ती कारागृहात अमरावती व पुण्यातील कैद्यांचे दोन गट आहेत. कारागृहातील कैदी सुरज कालीचरण ठाकूर याची बुधवारी (२७ डिसेंबर) नातेवाईकासोबत भेट होती. भेट घेतल्यानंतर तो सर्कल ऑफीस जवळून जात असताना पुण्यातील बंदिस्त कैदी मतीन हकीम सय्यद, आसीफ अल्लबक्स शेख, महेश उर्फ दादू पुंडलिक मोरे, रुपेश प्रकाश आखाडे, अजय गाडगे, फकीरुद्दीन शेख आणि रोहित लक्ष्मण गायकवाड यांनी पत्र्याच्या सहाय्याने त्याच्यावर हल्ला चढविला. यात सूरज ठाकूर गंभीररित्या जखमी झाला. त्यानंतर अमरावतीमधील बंदिस्त कैदी लखन उर्फ धनराज वानखेडे, अमन बाबाराव देवळेकर त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यानंतर दोन्ही गटात हाणामारी सुरू झाली. ही हाणामारी रोखण्यासाठी तुरूंग अधिकारी उमेश गुंडर कर्मचाऱ्यांसह गेले असता त्यांच्यावर मतीन हकीम सय्यद या कैद्याने पत्र्याच्या साहाय्याने हल्ला केला. यामध्ये तुरुंग अधिकारी गुंडरे यांच्यासह पाच कर्मचारी गंभीर जखमी झाले. या घटनेचे गांभीर्य पाहून कारागृहातील अन्य कर्मचारी व अधिकाऱ्यांनी धाव घेतली आणि बळाचा वापर करून दोन्ही गटातील कैद्यांना वेगवेगळ्या बॅरकमध्ये रवाना केले. या हल्ल्याप्रकरणी १० कैद्यांवर खुनाचा प्रयत्न आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेने कारागृह परिसरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा :