Amravati husband killed by wife
अमरावती : अज्ञात व्यक्तीच्या डोक्यावर दगड मारून हत्या केल्याची घटना शहरातील हनुमान गढी ते भानखेडा मार्गावर बुधवारी (दि.१२) रात्री समोर आली होती. या हत्येचा तपास फक्त ८ तासांत पूर्ण करून अमरावती पोलिसांनी आरोपीला बुलढाण्यातून अटक केली आहे. चौकशीत धक्कादायक बाब समोर आली असून, अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्यामुळे पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.
मृतकाचे नाव प्रमोद बकाराम भलावी (वय ४२, कारला, चांदूर रेल्वे) असे असून, अटक आरोपींची नावे विश्वंभर दिगंबर मांजरे (वय ३९, विश्वी, बुलढाणा) आणि छाया भलावी (पत्नी) अशी आहेत. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेला कोयता आणि मोटरसायकल (एमएच २८/एनबी १३९९) जप्त केली आहे.
बुधवारी रात्री १२ नोव्हेंबर रोजी हनुमान गढी परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. दगडाने डोक्यावर वार केलेल्या अवस्थेत तो असल्याने त्याची ओळख पटत नव्हती. मात्र, घटनास्थळाजवळ पोलिसांना एक बाईक सापडली. तिच्या क्रमांकावरून तपास करत असताना ती अचलपूर येथील टवलार गावातील एका युवकाने प्रमोद भलावीला विकली असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी चांदूर रेल्वे तालुक्यातील कारला येथे जाऊन चौकशी केली असता प्रमोद घरातून गायब असल्याचे लक्षात आले. त्यामुळे तोच मृतक असल्याची पोलिसांची खात्री पटली.
प्रमोद भलावी यांचा विवाह आठ वर्षांपूर्वी छाया हिच्याशी झाला होता. काही काळ दोघे चंद्रपूर येथे काम करत होते. पण मतभेद झाल्याने छाया माहेरी आली. २०२४ मध्ये तिच्या घरी छपाईचे काम करण्यासाठी विश्वंभर मांजरे आला आणि त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. एक महिन्यापूर्वी प्रमोद पुन्हा घरी आला. त्याला पत्नीच्या वर्तनावर संशय आला होता. याच कारणावरून छाया आणि तिच्या प्रियकराने प्रमोदचा खून करण्याचा कट रचला. १० नोव्हेंबरला छाया आणि विश्वंभर अमरावतीत भेटले. दोघांनी एका हॉटेलमध्ये जेवण केले, नंतर हनुमान गढी परिसरातील सुनसान जागा निवडली. त्यांनी एक कोयता खरेदी केला. त्या रात्री छायाने पती प्रमोदला फोन करून सांगितले की, ‘मी अमरावतीत आली आहे, मला घेऊन जा.’ त्यामुळे प्रमोद हा दुचाकीने निघाला होता. तिला बसवून घरी जात असताना छायाने हनुमान गढीजवळ गाडी थांबवली.
इतक्यात मागे दबा धरून बसलेला विश्वंभर पुढे आला आणि त्याने प्रमोदच्या मानेला व शरीरावर कोयत्याने वार केले. प्रमोद जागीच मृत्युमुखी पडला. ओळख पटू नये म्हणून दोघांनी त्याच्या डोक्यावर दगडाने वार केले.
तांत्रिक तपास आणि गुप्त सूत्रांच्या मदतीने अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाने विश्वंभर मांजरे याला बुलढाणा जिल्ह्यातील विश्वी गावातून अटक केली. त्याच्या ताब्यातून हत्येत वारपरलेला कोयता आणि मोटरसायकल जप्त करण्यात आली. छाया भलावीला बडनेरा ठाण्यात चौकशीनंतर अटक करण्यात आली. गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या ८ तासांत या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली इमरान नायकवडे, अनिकेत कासार (सायबर), दीपक सुंदरकर, संभाजी केंद्रे, मनोज ठोसर, संग्राम भोजने, अतुल संभे, राजीक रायलीवाले, राहुल देंगेकार, नरेश मोहरील, सुषमा आठवले यांनी केली.