अमरावती, पुढारी वृत्तसेवा : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील चार तालुक्यात अतिवृष्टीचा फटका बसला आहे. ग्रामीण भागाला पावसाने चांगले झोडपले आहे. गावांसह शेतात पाणी भरले आहे. अमरावती ,चांदुर रेल्वे ,धामणगाव आणि वरुड मध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात दोन ठिकाणी भिंत कोसळली आहे. यामध्ये मोर्शी तालुक्यातील एका गावात भिंत कोसळल्याने स्वरूप प्रशांत गाजरे (वय ३) या बालकाचा मृत्यू झाला तर रेखा सुखदेव गाजरे (वय ४९) जखमी आहे. ३३ घरांची पडझड झाली आहे.
रविवारपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी शिरले आहे. ग्रामीण भागात शेतामध्ये पाणी शिरल्याने पिकांवर परिणाम झाला आहे. कच्च्या घरांच्या भिंती कोसळल्या आहे. जिल्ह्यात २१७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे अप्पर वर्धा धरणाचा जल स्तर वाढला आहे. पावसामुळे ५५० हेक्टर मधील पिके प्रभावित झाली आहे. ४४१ हेक्टरवरील पिके पाण्यामुळे वाहून गेली आहे. यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्र हाहाकार आहे. प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चांदुर रेल्वे मध्ये संततधार पावसामुळे एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेच्या घराची भिंत मध्यरात्री कोसळली. यामध्ये सुदैवाने जीवितहानी टळली. मुक्ताबाई मरसकोल्हे (वय ७५) असे या महिलेचे नाव आहे. बुधवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास पावसामुळे मुक्ताबाई यांच्या घराची भिंत कोसळली. त्या झोपेत असताना ही घटना घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या दुर्घटनेमुळे वृद्ध महिलेचा संसार उघड्यावर आला आहे. घरातील जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्य पावसाच्या पाण्याने भिजले आहे. त्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
धामणगाव रेल्वे शहरात पावसाचे पाणी साचल्याने भुयारी मार्ग बंद करण्यात आला आहे.दरवर्षी पावसाळ्यात भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचते.सद्या पावसाचे पाणी साचल्याने भुयारी मार्गावरील वाहतूक बंद असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.