अमरावती : राज्य शासनाने मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिल्यामुळे कर्ज, किसान क्रेडिट कार्ड आणि इतर सुविधा प्राधान्याने उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे मत्स्यव्यवसाय हे आता एक प्राधान्याचे क्षेत्र बनले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते मोर्शी येथे महाराष्ट्रातील चौथ्या आणि पश्चिम विदर्भातील पहिल्या मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या भूमिपूजन समारंभात बोलत होते.
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, खासदार अनिल बोंडे, आमदार प्रताप अडसड यांच्यासह अनेक मान्यवर, अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राज्यातील ४० टक्के मत्स्य उत्पादन गोड्या पाण्यातील व्यवसायातून होते. या क्षेत्राला चालना देण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल. शेततळ्यांमध्ये मत्स्य व्यवसाय सुरू केल्याने शेतकऱ्यांना सिंचनासोबतच रोजगाराची संधी मिळाली असून, त्यांच्या जीवनमानात सुधारणा होत आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन कटिबद्ध असून, अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी विदर्भाच्या विकासासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. विदर्भाची भाग्यरेषा ठरणारी 'वैनगंगा-नळगंगा' योजना, मुख्यमंत्री सौर कृषी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा आणि वीजदरात कपात यांसारख्या योजनांची माहिती त्यांनी दिली. तसेच, राज्यात ३० लाख घरे मंजूर झाली असून, ५ लाख घरांवर सौरऊर्जा यंत्रणा बसवून नागरिकांना वीज बिलातून दिलासा दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून महाविद्यालयाच्या कोनशिलेचे अनावरण केले. यावेळी भोई समाजातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.