Badnera Akola Road Truck Car Collision
अमरावती : बडनेरा पोलीस ठाणे हद्दीत येणार्या अकोला मार्गावरील वाय पॉईंट वर शनिवारी (दि. ७) नागपूरकडे जाणार्या कारला ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात वासुदेव नारायण राणे (वय ५०) व पत्नी शालू वासुदेव राणे (वय ४५ दोघे रा. कानदडा गाव, जळगाव, खान्देश) यांचा जागीच मृत्यू झाला. तर राणे दाम्पत्याची मुले आणि त्यांची भाची असे चार चिमुकले जखमी झाले.
अधिक माहितीनुसार वासुदेव राणे आणि त्यांची पत्नी आपली मुलगी चैताली (वय ११), इशिता (वय १०), मुलगा पार्थ (वय ६) आणि त्यांची भाची खुशबू विष्णू राणे (वय १४) यांच्यासोबत कारने (एमएच ४९ एई १५८८) नागपूरकडे जात होते. त्यांची कार बडनेराजवळ सुपर एक्सप्रेस हायवे वरील अकोला वाय पॉईंट जवळ पोहोचली असता त्यावेळी समोरून येणार्या ट्रक (एमएच ४० सीडी ८१६७) ने कारला जोरदार धडक दिली. यात कार चालक वासुदेव राणे आणि त्यांच्याजवळ बसलेली त्यांची पत्नी शालू राणे यांचा जागीच मृत्यू झाला. तर चारही मुले मागे बसल्यामुळे ते जखमी झाले.
तीन मुलांना गंभीर दुखापत झाली आहे. तर एकाला किरकोळ दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच बडनेरा पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून जखमी आणि मृतांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. जेथे डॉक्टरांनी तपासून पती-पत्नींना मृत घोषित केले. जखमी मुलांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी जळगाव खान्देश येथील राणे कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच ते अमरावतीसाठी रवाना झाले. अमरावतीत पोहोचल्यावर पोलिसांनी त्यांना मुलांची कस्टडी दिली आणि पोस्टमार्टम झाल्यावर राणे दाम्पत्याचे मृतदेह त्यांच्या सुपूर्द केले. या प्रकरणात पोलिसांनी अपघातास जबाबदार ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.