अमरावती : मोर्शी तालुक्यातील चिंचोली गवळी गावात घरात खेळत असलेल्या चार वर्षांच्या चिमुकलीचा विषारी सापाच्या दंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि. २६) रात्री घडली. कनक रोशन पाटील (वय ४) असे मृत मुलीचे नाव आहे.
कनक रात्री आपल्या घरात खेळत असताना घरात शिरलेल्या विषारी सापाने तिला दंश केला. प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला तातडीने मोर्शी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर झाल्याने तिला रात्री १०.४५ वाजता अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी उपचारासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचारादरम्यान कनकचा मृत्यू झाला.
कनकच्या मृतदेहाचे जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर तिच्या पार्थिवावर कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार केले. या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.