अमरावती : जिल्हा हादरवून टाकणार्या बडनेरा खून प्रकरणात धक्कादायक वळण समोर आले आहे. स्वतःच्या बहिणीला जावयाकडून होणार्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून मेहुण्यानेच खुनाचा कट रचत सुपारी दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले.
या प्रकरणात पोलिसांनी आणखी तीन आरोपींना अटक केली असून, आरोपींची एकूण संख्या ८ वर पोहोचली आहे. मात्र, खुनाची सुपारी स्वीकारणारा अक्षय शिंपी अजूनही फरार आहे. धक्कादायक बाब म्हणजे या हत्याकांडाचा सूत्रधार राहुल भगवंत पुरी (वय ३६, माणिकवाडा धनज, नेर, यवतमाळ) हा शिक्षक असल्याचेही उघड झाले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे, रमेश धुमाळ, सहाय्यक आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या पथकाने केला.
पुंडलिकबाबा नगरातील रहिवासी अतुल ज्ञानदेव पुरी यांची हत्या बडनेरातील तिलकनगर मार्गावर २२ ऑगस्ट रोजी करण्यात आली होती. मृत जावयाकडून बहिणीला होणारा त्रास पाहून तिचा भाऊ राहुल पुरीने हा कट रचला. त्याने मित्र प्रशांत भाष्करराव व-हाडे (वय ४२, माणिकवाडा धनज, नेर, सध्य पार्वतीनगर) व गौरव गजानन कांबे (वय २९, राठी नगर, अमरावती) यांना या प्रकरणात सहभागी करून घेतले. यानंतर प्रशांत व-हाडेनेच राहुलची ओळख अक्षय शिंपीशी करून दिली. ५ लाख रुपयांत खुनाची सुपारी ठरली. त्यातील पैसे राहुल व प्रशांतने शिंपी व गौरव कांबे यांना दिले. त्यापैकी दोन लाख रुपये त्यांनी साहिल उर्फ गोलू मोहोड, सक्षम लांडे व तिन्ही अल्पवयीनांना वाटून दिले आणि खून घडवून आणला.
या प्रकरणात याआधीच पोलिसांनी साहिल मोहोड (वय १९), सक्षम लांडे (वय १९) व तिन्ही अल्पवयीनांना पकडले होते. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असतानाच आता आणखी तिघांना अटक करण्यात आली. मुख्य सुपारी घेणारा अक्षय प्रदीप शिंपी (वय ३०, गणेडीवाल लेआउट, कॅम्प, अमरावती) हा फरार असून, त्याचा शोध पोलीस घेत आहेत.