

अमरावती : शहरातील पुंडलिक बाबानगर येथील एका ५० वर्षीय वरिष्ठ लिपिकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गुरूवारी (दि.२२) बडनेरा येथील जुनी वस्ती परिसरात घडली. अतुल ज्ञानदेव पुरी (वय ४२) असे मृताचे नाव आहे.
अतुल पुरी यांचा शुक्रवारी जुनी वस्ती तिलकनगर परिसरातील रस्त्यावर मृतदेह आढळून आला. त्यानंतर या खुनाच्या घटनेचा उलगडा झाला. अतुल पुरी हे बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील पुंडलिक महाराज महाविद्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. ते कर्तव्यावर जात असताना ही घटना घडली.
अतुल पुरी रोज सकाळी ७ वाजता दुचाकीने घरून निघत आणि बडनेरा रेल्वेस्थानकावर त्यांची दुचाकी ठेवून रेल्वेने महाविद्यालयाकडे जात असत. गुरूवारी सकाळी ते घरून निघाले, मात्र थोड्याच वेळात त्यांचा मृतदेह तिलकनगराजवळील रस्त्याच्या कडेला आढळला. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर बडनेरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी सहायक पोलिस आयुक्त कैलास पुंडकर, क्राईम पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, बडनेरा पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांनी पाहणी केली आणि पुरावे ताब्यात घेतले. मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.