अमरावती, पुढारी वृत्तसेवा: विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्याबाबत सरकार संवेदनशील दिसत नाही. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये हिंदू शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. मात्र, राज्यात आणि केंद्रातही हिंदुत्ववादी सरकार असताना हिंदू शेतकऱ्यांवर स्वतःला संपवण्याची वेळ का येत आहे, असा प्रश्न प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी राज्य आणि केंद्र सरकारला विचारला आहे. (Amravati News)
बच्चू कडू आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्या नेतृत्वात अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर शेतकरी आणि मेंढपाळांच्या विविध मागण्यांसाठी वाडा आंदोलन करण्यात आले. यादरम्यान बच्चू कडू बोलत होते. (Amravati News)
बच्चू कडू पुढे म्हणाले की, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतात. मात्र, तरीही सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही. त्यामुळेच आम्ही शेतकरी शेतमजूर आणि मेंढपाळांच्या समस्यांना घेऊन रस्त्यावर उतरलो आहोत. आंदोलन आमच्यासाठी नवीन नाही, आमचा जन्म आंदोलनासाठी झाला, पदावर असो किंवा नसो आम्ही सर्वसामान्यांच्या न्यायासाठी संघर्षाची भूमिका सोडणार नाही, असेही ते म्हणाले.
दरम्यान, या आंदोलनात बच्चू कडू आणि महादेव जानकर हे मेंढपाळांच्या वेशात सहभागी झाले होते. मोर्चामध्ये शेळ्या, मेंढ्या आणि घोड्यांसह मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी झाले होते.
या मागण्यांसाठी आंदोलन
राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या काळात दिलेल्या घोषणांची पूर्तता करावी, सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, चराई करता परराज्यातून येणाऱ्या मेंढपाळांवर बंदी घालण्यात यावी, मेंढपाळांसाठी धोरण निश्चित करण्यात यावे, खोट्या केसेस मागे घेण्यात याव्या, मेंढ्यांचे मोबाईल हॉस्पिटल तयार करण्यात यावे, घरकुलसह स्थायी निवारा देण्यात यावा, चेक पोस्टवर झालेल्या कार्यवाहीचा मागील दोन वर्षाचा वस्तुनिष्ठ अहवाल देण्यात यावा, आदी मागण्या वाडा आंदोलनाच्या माध्यमातून केल्या आहेत.