

अमरावती : कौटुंबिक वादातून पतीनेच पत्नीची हत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.२) सायंकाळी फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राजेंद्र नगर स्थित भवते लेआऊट परिसरात उघडकीस आली. घटनेनंतर पती फरार असून, पोलिस त्याचा कसून शोध घेत आहे. भाग्यश्री अक्षय लाडे (वय २८, रा. भवते लेआऊट, राजेंद्र नगर) असे मृतक महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यश्री हिचे अमरावतीतच यशोदानगर ते महादेव खोरीदरम्यान भवते लेआऊट परिसरात सासर आहे तर माहेर हे राजेंद्र नगरात आहे. सात वर्षांपूर्वी भाग्यश्रीचे अक्षय लाडे याच्यासोबत लग्न झाले होते. त्यांना पाच वर्षांची मुलगी देखील आहे. परंतू गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीचा काही कारणावरून वाद झाला होता. त्यामुळे पत्नी भाग्यश्री ही माहेरी गेली होती. त्यानंतर १ जानेवारी रोजी रात्री भाग्यश्री ही तीच्या मोपेड वाहनाने सासरी कपडे घ्यायला गेली. मात्र ती घरी परतली नाही.
त्यामुळे आईने फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरु करून भाग्यश्रीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिच्या मोबाईलचे लोकेशन हे रेल्वेस्थानक परिसरात असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी रेल्वेस्थानक येथे जाऊन पाहिले असता, तेथे भाग्यश्रीची गाडी दिसली आणि त्यात तिचा मोबाईल देखील सापडला. त्यानंतर पोलिसांनी भाग्यश्रीच्या सासरी जाऊन पाहिले. घराला लॉक असल्यामुळे दाराचे कुलुप तोडण्यात आले. त्यावेळी भाग्यश्री ही बेडवर मृतावस्थेत आढळून आली. पोलिसांनी पंचनामा केला. प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
दरम्यान या घटनेपासून संशयित पती अक्षय लाडे हा पसार आहे. या घटनेच्या अनुषंगाने रात्री उशिरापर्यंत पोलिसांची कायदेशिर प्रक्रिया सुरु होती. पोलिस आरोपीचा शोध घेत आहे. पोलिसांसह फॉरेंसीक टीमही घटनास्थळी दाखल झाली होती.परिसरातील नागरिकांनी देखील घटनास्थळी गर्दी केली होती.