Bachchu Kadu  Pudhari
अमरावती

Bachchu Kadu | बच्चू कडू यांना मोठा दिलासा; रस्ता अपघात कटाच्या आरोपात अटकपूर्व जामीन मंजूर

अचलपूर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय; आमदार प्रवीण तायडे यांनी केले होते गंभीर आरोप

पुढारी वृत्तसेवा

Achalpur Court anticipatory bail

अमरावती: राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या रस्ता अपघात षड्यंत्र प्रकरणात माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना अचलपूर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. आमदार प्रवीण तायडे यांचे चुलत भाऊ अभिजीत तायडे यांना रस्ता अपघातात ठार मारण्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, सोमवारी झालेल्या सुनावणीत न्यायाधीश सागर पाटील यांनी बच्चू कडू यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

काही दिवसांपूर्वी आमदार प्रवीण तायडे यांनी चांदूरबाजार पोलीस ठाण्यात एक कथित ऑडिओ क्लिप सादर केली होती. या क्लिपमध्ये बच्चू कडू आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांमध्ये संभाषण होत असून, त्यात अभिजीत तायडे यांचा रस्ता अपघातात काटा काढण्याचे नियोजन केले जात असल्याचा खळबळजनक आरोप आमदार तायडे यांनी केला होता. या ऑडिओ क्लिपमध्ये यवतमाळच्या 'टिप्पर गँग'चा उल्लेख असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले होते. कडू यांच्या कुरळपूर्णा येथील निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा कट रचला गेल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणी तायडे यांनी पत्रकार परिषद घेऊन कडू यांच्यावर गंभीर आरोप केल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

या संपूर्ण वादावर बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना, हे सर्व आरोप म्हणजे एक राजकीय षडयंत्र असल्याचे म्हटले होते. एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या मोहिमेवरून परत आल्यानंतर यावर अधिक सविस्तर बोलणार असल्याचे त्यांनी नमूद केले होते. दरम्यान, संभाव्य अटक टाळण्यासाठी बच्चू कडू यांनी आपले वकील ॲड. महेश देशमुख यांच्या माध्यमातून अचलपूर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती.

सोमवारी या याचिकेवर दोन्ही पक्षांचा प्रदीर्घ युक्तिवाद झाला. सरकार पक्ष आणि बचाव पक्ष यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर, न्यायालयाने परिस्थितीचे गांभीर्य आणि उपलब्ध पुरावे विचारात घेऊन बच्चू कडू यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. या निर्णयामुळे बच्चू कडू आणि त्यांच्या समर्थकांना मोठा दिलासा मिळाला असून, तायडे विरुद्ध कडू या कायदेशीर लढाईत तूर्तास कडू यांचे पारडे जड झाले असल्याचे मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT