अमरावती : अचलपूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार बच्चू कडूंसह तीन कार्यकर्त्यांवर परतवाडा पोलिस ठाण्यात २३ एप्रिल २०१६ रोजी वाहतूक कर्मचार्यास मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. याबाबत अचलपूर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने शुक्रवारी (दि.२३) निकाल देत माजी राज्यमंत्री बच्चू कडूंसह अंकुश जवंजाळ, मंगेश देशमुख, धिरज निकम यांची निर्दोष मुक्तता केली.
परतवाडा शहरातील बस आगारासमोर सतत वाहतूक कोंडी होत होती. तसेच अनेक अपघाताच्या घटनाही या ठिकाणी घडल्या होत्या. यादरम्यान २३ एप्रिल २०१६ रोजी कर्तव्यावर हजर असलेले वाहतूक कर्मचारी इंद्रजीत रामेश्वर चौधरी यांना बच्चू कडू यांनी वाहतूकी संदर्भात सूचना केल्या होत्या. दरम्यान वाद निर्माण होऊन वाहतूक कर्मचारी यांनी माजी आमदार बच्चु कडू सह चार लोकांविरुध्द तक्रार दाखल केली होती. शासकीय कामात अडथळा निर्माण करून शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी परतवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी प्रथम न्याय दंडाधिकारी यांनी १७ जानेवारी २०१८ ला बच्चू कडूंसह तिघांना शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली होती. याविरूद्धात बच्चु कडू यांनी जिल्हा व सत्र न्यायालय अचलपूर येथे अपील दाखल केली होती. अॅड. महेश देशमुख यांनी १६ मे रोजी कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय चुकीचा असल्याबाबत प्रभावी युक्तीवाद करत साक्षीदार व परिस्थितीजन्य पुरावे यामध्ये तफावत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या सहा महिन्याच्या शिक्षेचा निर्णय जिल्हा व सत्र न्यायाधिश क्रं. २ अचलपूर न्या. आर.बी. रेहपांडे यांच्या न्यायालयाने रद्द करत बच्चू कडूसह तिघांना या खटल्यातून निर्दोष मुक्त केले. अॅड. महेश देशमुख यांना अॅड आशिष देशमुख, अॅड चैतन्य खारोळे यांचे सहकार्य मिळाले.