अमरावती : शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत भाजप आणि मित्र पक्षाला आगामी निवडणुकीत मतदान करू नका, असे आवाहन प्रहार संघटनेचे प्रमुख माजी आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करणारे बच्चू कडू मॅनेज झाल्याचा आरोप होतो आहे. त्यावरूनही बच्चू कडूंनी विरोधकांवर रविवारी (दि.2) पत्रकार परिषदेत निशाणा साधला. तुम्ही आंदोलन करा त्यात आम्हीही येऊ असे ते म्हणाले. 30 जून 2026 पर्यंत सरकारने कर्जमाफी केली नाही तर 1 जुलै रोजी हंगामा होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
शेतकरी अजूनही आमच्या बाजूने उभा आहे. त्याला विश्वास आहे. आम्ही आंदोलनादरम्यान भर पावसात ट्रॅक्टर खाली होतो. तेथेच झोपलो, त्याचं कौतुक झालं नाही. सात दिवस अन्नत्याग आंदोलन केलं त्याचंही कौतुक कोणी केलं नाही. दीडशे सभा संपूर्ण महाराष्ट्रात घेतल्या त्याचेही कौतुक झालं नाही. फक्त आमचं काय चुकलं हेच बघितलं जातं. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आम्ही थांबवायला चाललो आहे. मात्र उद्या आमच्यावरच आत्महत्येची वेळ येईल,अशी अवस्था आहे, असेही बच्चू कडू म्हणाले.
30 जून पर्यंत कर्जमाफी झाली नाही तर 1 जुलै रोजी चहू बाजूने हंगामा होईल. आणि जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदे यांची शिवसेना या पक्षांना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदान करू नका असे आवाहन त्यांनी केले.