Anti-Corruption Bureau
अमरावती : संस्था नोंदणी करून प्रमाणपत्र देण्याकरिता ८ हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या सहाय्यक निबंधकासह मुख्य लिपिकाला अकोला येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (दि.२८) रंगेहात अटक केली. ही कारवाई अंजनगाव सुर्जी येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात करण्यात आली.
अकोला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अंजनगाव सुर्जीच्या बाजार समिती परीसरात सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेचे कार्यालयात सापळा रचून सहाय्यक निबंधकासह लिपिकास लाच स्विकारताना रंगेहात पकडले. आरोपी लोकसेवकांमध्ये सहाय्यक निबंधक राजेश आर. यादव व मुख्य लिपिक गणेश कुकडे यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली.
सहकार पणन वस्रोद्योग क्षेत्राशी निगडीत सहाय्यक निबंधक संस्था ही तालुक्यातील सहकार, सोसायट्या, पतसंस्था, बाजार समित्या यांचेवर नियंत्रण ठेवणारे कार्यालय आहे. त्याच माध्यमातुन एका व्यक्तीने भंडारज स्थित नियोजित मथुराबाई गृहतारण सहकारी संस्था मर्या. भंडारज या नावाने संस्था नोंदणी करण्याकरीता अंजनगांव सुर्जी सहकारी संस्थेच्या सहाय्यक निबंधक यांच्याकडे आवश्यक सर्व कागदपत्रांसह प्रस्ताव सादर केलेला होता. भंडारज सहकारी संस्थेच्या पदाधिकारी तथा तक्रारदार यांनी संबंधीत सोसायटीचे पाठपुराव्यास २२ एप्रिल रोजी सहाय्यक निबंधक कार्यालय प्रमुख सहाय्यक निबंधक राजेश आर. यादव यांना भेटून संस्था नोंदणी बाबतचे काम झाले का? याबाबत विचारणा केली. त्यांनी संस्था नोंदणी करून प्रमाणपत्र देण्याकरीता तक्रारदाराकडे ७ हजार रूपये लाचेची मागणी केली.त्यावेळी तक्रारदारांनी नाईलाजास्तव राजेश यादव यांना २ हजार रूपये दिले व उर्वरीत ५ हजार नंतर आणून देतो असे सांगितले.
त्यामुळे या घटनेची तक्रार अकोला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे नोंदविली. सदर तक्रारीवरुन २५ एप्रिल रोजी लाच लुचपत विभाग अकोला येथील चमुने लाच पडताळणी कारवाई दरम्यान आरोपी सहाय्यक निबंधक यांनी स्वतः करीता ५ हजार रूपये व आरोपी लिपीक यांनी तक्रारदाराकडे ३ हजार रूपये लाच रकमेची मागणी करून लाच रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर २८ एप्रिल रोजी एसीबीने सहाय्यक निबंधक कार्यालय, सहकारी संस्था, अंजनगांव सुर्जी येथे सापळा रचून राजेश आर. यादव व गणेश एन. कुकडे यांना लाच रक्कम स्वीकारतांना रंगेहात पकडले. दोन्ही आरोपींना लाच रक्कमेसह ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुध्द अंजनगांव सुर्जी ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मारुती जगताप, पोलीस उपअधीक्षक मिलिंदकुमार बहाकर, दिगंबर जाधव, राहुल इंगळे, अभय बावस्कर, किशोर पवार, नीलेश शेगोकार, संदीप टाले, असलम शहा यांनी केली.