Arvi Amravati Road Bike Collision  Pudhari
अमरावती

Amravati Accident | आर्वी-अमरावती मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक: तरुणासह तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

विरगव्हाणजवळ अपघात, तिघे गंभीर जखमी

पुढारी वृत्तसेवा

Arvi Amravati Road Bike Collision

अमरावती: आर्वी-अमरावती मार्गावर विरगव्हाणजवळ रविवारी (दि.१६) दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात वंश सतीश मुडे (वय २२, रा. आर्वी) व अभिण्या धीरज तायडे (वय ३, रा. गाडगेनगर, अमरावती) या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. जखमींवर अमरावतीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रविवारी सकाळी विरगव्हाणपासून काही अंतरावर हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकी क्रमांक एमएच ३२ एबी ८९७८ आणि बुलेटची समोरासमोर धडक झाली. धडक एवढी जोरदार होती की दोन्ही वाहनांवरील व्यक्तींना गंभीर दुखापत झाली. या अपघातात वंश (वय २२, रा. आर्वी) याचा मृत्यू झाला. तसेच बुलेटवर असणारे धीरज तायडे यांची मुलगी अभिण्या धीरज तायडे (वय ३, रा. गाडगेनगर, अमरावती) ही गंभीर रित्या जखमी झाली होती. दोघांना रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

अपघातात धीरज तायडे, त्यांची पत्नी पुनम तायडे (रा. गाडगेनगर) तसेच अथर्व पंडीत मेश्राम (वय १७, रा. विरगव्हाण) हे तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने अमरावतीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच कुर्‍हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले. अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. या घटनेचा पुढील तपास कुर्‍हा पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT