Amravati Police
अमरावती: जुन्या वैमनस्यातून दिवाळीच्या रात्री एका ३१ वर्षीय तरुणाची चाकूने गळ्यावर वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील महेंद्र कॉलनीत घडली. चैतन्य ऊर्फ निक्कू राजेंद्र कचरे (वय ३१) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून, भूषण राजेश टाले, राजू शरद काळे आणि विशाल श्यामबहादूर यादव या तिघांना अटक केली आहे. तर एक आरोपी फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत चैतन्यचे वडील राजेंद्र तुलसीराम कचरे (वय ६५) हे एसटी महामंडळातून चालक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, चैतन्य आणि महेंद्र कॉलनीतील राजू काळे यांच्यात सुमारे सहा ते सात वर्षांपूर्वी वाद झाला होता. त्यावेळी चैतन्यने राजूवर चाकूने हल्ला केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन चैतन्यला अटकही झाली होती. तेव्हापासून दोघांमध्ये वैमनस्य असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी (दि. ८) रात्री सुमारे १० वाजता चैतन्य घरी झोपलेला असताना त्याच्या मोबाइलवर विशाल यादव याचा फोन आला. फोनवर राजू काळेदेखील बोलत होता. त्यांनी चैतन्यला महेंद्र कॉलनीतील रेतीच्या ठिय्यावर दारू पिण्याच्या बहाण्याने बोलावले. वडिलांनी जाण्यास मनाई केली असतानाही चैतन्य आपल्या मोपेडने तेथे गेला. चैतन्य घटनास्थळी पोहोचताच तेथे दबा धरून बसलेल्या गुल्ल्या नामक आरोपीने रात्री त्याच्या गळ्यावर चाकूने वार केले. गंभीर जखमी झालेल्या चैतन्यला आरोपी घटनास्थळी सोडून पसार झाले. गुल्ल्या हा भूषण टाले याच्या दुचाकीवरून पळून गेला.
दरम्यान, जखमी चैतन्यला कुटुंबीयांनी तातडीने अमरावती जिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. वडील राजेंद्र कचरे यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी राजू काळे, विशाल यादव, गुल्ल्या ऊर्फ अश्विन पहाडण आणि भूषण टाले यांच्याविरुद्ध कट रचून हत्या केल्याचा गुन्हा दाखल केला. गाडगेनगर पोलिसांच्या दोन्ही डीबी पथकांनी संयुक्त कारवाई करून तिघांना अटक केली. फरार आरोपी गुल्ल्या याचा शोध सुरू आहे.