Youth Killed Amravati
अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाणे हद्दीत येणार्या विलासनगर परिसरातील संविधान चौकात बुधवारी (दि.२०) सायंकाळी जुन्या वादातून यश रवींद्र पाटणकर (वय २४, विलासनगर) याचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास यश पाटणकर विलास नगर परिसरात होता. त्यावेळी दोन दुचाकीवर आलेल्या ३ ते ४ हल्लेखोरांनी त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. यशच्या पाठीवर आणि छातीवर गंभीर जखमा झाल्या. त्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात तो जमिनीवर खाली पडला होता. नागरिकांनी त्याला ऑटोमध्ये टाकून अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.
मात्र, येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती गाडगेनगर पोलिसांना मिळताच त्यांनी पंचनामा करून गुन्हा दाखल केला. हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. जुन्या वादातून हा खून झाल्याचे बोलले जात आहे. माहितीनुसार यश पाटणकर वर देखील पोलीस ठाण्यामध्ये या आधी गुन्हे दाखल आहेत.
दोन दिवसांपूर्वी साजरा केला वाढदिवस
माहितीनुसार घटनेच्यावेळी स्वतःला आरोपींच्या तावडीतून वाचवण्यासाठी यश पाटणकर इकडे-तिकडे पळत होता. भंडारी रुग्णालय परिसरात तो पोहोचला होता. पण मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे तो रुग्णालयाच्या गेटवर कोसळला. नागरिकांनी त्याला उचलून जिल्हा सामान रुग्णालयात दाखल केले. दोन दिवसांपूर्वीच यश पाटनकरने मोठ्या उत्साहाने आपल्या मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला होता.