Congress Party Whip Defied
अमरावती : अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच आज काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह आणि गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. निवडणुकीत तटस्थ राहण्याच्या आणि मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या पक्ष नेतृत्वाच्या आदेशाला (व्हीप) केराची टोपली दाखवत काँग्रेसच्या अनेक नगरसेवकांनी थेट मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. यामुळे अमरावतीत काँग्रेसला मोठा धक्का बसला असून पक्षात उभी फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
अमरावती विधान परिषदेच्या जागेसाठी आज उत्साहात मतदान पार पडत आहे. या निवडणुकीची मतमोजणी येत्या २२ जून रोजी होणार असून, त्या दिवशीच खरा फैसला होणार आहे. मात्र, मतदानाच्या दिवशीच काँग्रेसच्या गोटात झालेल्या या बंडखोरीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षजीत देशमुख यांनी ऐनवेळी निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतल्यामुळे काँग्रेसची मोठी कोंडी झाली होती. या पार्श्वभूमीवर, वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा नाकारत शहर काँग्रेसने ऐन वेळेवर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला .
महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते विलास इंगोले तसेच शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत यांच्या स्वाक्षरीने एक अधिकृत 'व्हीप' (पक्षादेश) जारी करण्यात आला होता. यामध्ये सर्व नगरसेवकांना मतदानाला गैरहजर राहून तटस्थ राहण्याचे आदेश देण्यात आले होते, तसेच व्हीपचे उल्लंघन केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला होता.
या संपूर्ण वादात एक महत्त्वाची बाब समोर आली आहे की, विधान परिषद निवडणुकीत अशा प्रकारे 'तटस्थ' राहण्यासाठी किंवा 'मतदान न करण्यासाठी' व्हीप जारी करता येत नाही, असे घटनातज्ज्ञांचे मत आहे. जिथे गुप्त मतदान पद्धती असते, तिथे मतदानाचा हक्क नाकारणारा असा व्हीप कायदेशीररित्या टिकत नाही. याच तांत्रिक बाबीचा फायदा घेत नाराज नगरसेवकांनी पक्षादेश पाळण्यास स्पष्ट नकार दिला.
काँग्रेसमधील या अंतर्गत बंडाळीमुळे आणि काँग्रेस उमेदवाराच्या माघारीमुळे भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे आणि वंचितचे निलेश विश्वकर्मा यांच्यातच मुख्य लढत होत आहे. मात्र, प्रवीण पोटे यांनी गेल्या दोन वर्षांपासून केलेली जोरदार पूर्वतयारी आणि प्रचाराच्या फेऱ्यांमुळे त्यांचे पारडे प्रचंड जड मानले जात असून, त्यांचा विजय आता जवळपास निश्चित मानला जात आहे. मात्र आता २२ जूनच्या मतमोजणीत कोणाला किती मते मिळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.