

अमरावती : अमरावती विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या (शिंदे गट) माजी आमदारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रवीण पोटे यांनी आजच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असताना, दुसरीकडे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या नेत्याकडूनच बंडखोरी झाल्याने युतीमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.
या मतदारसंघातून भाजपचे प्रवीण पोटे हे सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. महायुतीचे सर्व प्रमुख नेते त्यांच्या पाठीशी असल्याचा दावा केला जात होता. मात्र, विप्लव बाजोरिया यांनी थेट अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यामुळे प्रवीण पोटे यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. बाजोरिया कुटुंबाचा अकोला, वाशिम आणि अमरावती या भागात मोठा राजकीय प्रभाव आहे. विप्लव बाजोरिया यांनी यापूर्वी परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला होता, त्यामुळे त्यांचा बंडखोरीचा पवित्रा महायुतीसाठी अत्यंत चिंताजनक मानला जात आहे.