Maharashtra Legislative Council Election Pudhari
अमरावती

Amaravati Teachers Constituency | अमरावती शिक्षक मतदारसंघ : ५ जिल्ह्यात ६ वर्षात केवळ १८८ मतदारांची वाढ

यावेळच्या निवडणूकीसाठी पात्र मतदारांची अंतिम संख्या ३५,८१०

पुढारी वृत्तसेवा

बुलढाणा: विधान परिषदेच्या अमरावती शिक्षक मतदारसंघातील अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, अकोला व वाशिम या पाच जिल्ह्यात पात्र शिक्षक मतदारांची संख्या ही गेल्या सहा वर्षात केवळ १८८ इतकीच वाढली आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या यावेळच्या निवडणूकीसाठी पात्र मतदारांची अंतिम संख्या ही ३५,८१० आहे.

२०२०च्या निवडणूकीत मतदारांची संख्या ही ३५,६२२ होती. शिक्षक मतदारसंघ निवडणूकीच्या मतदारयादीत नाव समाविष्ट होण्यासाठी १ नोव्हेंबर २०२५ ही अहर्ता दिनांक व अलिकडच्या सहावर्षात किमान तीन वर्षे सेवा देणारे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक आणि महाविद्यालयीन प्राध्यापक हे मतदार म्हणून पात्र समजण्यात आले.

अधिकाधिक पात्र शिक्षकांची नावे मतदारयादीत समाविष्ट होण्यासाठी निवडणूक विभागाकडून मोठ्या प्रमाणात जागृती होऊनही आणि विविध शिक्षक संघटनाकडूनही गेल्या वर्षापासून प्रयत्न केले गेले. असे असूनही अमरावती विभागाच्या मतदार यादीत पाच जिल्ह्यातून गेल्या सहा वर्षात केवळ १८८ शिक्षक मतदारांची वाढ झाली आहे. अशी उदासिनता दिसण्याची काय कारणे,असावीत? हा प्रशासन व शैक्षणिक वर्तुळासाठी चिंतनाचा विषय ठरू शकतो.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीच्या २३ऑक्टोबर रोजी होणा-या मतदानासाठी पात्र मतदारांची संख्या ही एकूण ३५,८१० आहे. यामध्ये अमरावती जिल्हा- १०,०९७ बुलढाणा जिल्हा-९,१३४ यवतमाळ जिल्हा-६९३२, अकोला जिल्हा-५९४२ व वाशिम जिल्हा-३७१५ असे जिल्हानिहाय मतदार आहेत. यावेळी अमरावती विभागात एकूण ८१मतदान केंद्रे असून त्यांची जिल्हानिहाय संख्या अमरावती-२५, बुलढाणा-१८, यवतमाळ-१८, अकोला-१३ व वाशिम-७ याप्रमाणे आहे.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या २०२०मध्ये झालेल्या निवडणूकीत पात्र ३५,६२२ शिक्षक मतदारांपैकी ३०,९१८मतदारांनी आपला हक्क बजावला होता. मात्र मतपत्रिकेवर पसंतीक्रमानुसार मतदान करताना झालेल्या चुकांमुळे १०८९ मते बाद होऊन २९,८२९ मते वैध ठरली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT