अमरावती

Amravati crime तपोवन जंगलातील तरुणीच्या हत्येचा उलगडा; ओळख लपवण्यासाठी मृतदेह पेटवला

३०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले; मावस भावानेच गेम केल्याचे आले समोर

पुढारी वृत्तसेवा

अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तपोवन जंगल परिसरात जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या अनोळखी तरुणीच्या खुनाचा उलगडा करण्यात अमरावती शहर गुन्हे शाखेला यश आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या तरुणीची हत्या तिच्याच मावस भावाने केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, ओळख पटू नये म्हणून आरोपीने मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याची कबुली दिली आहे.      

तपोवन संस्थेच्या पडीत जागेत २ जून रोजी एका तरुणीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. गाडगेनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलीस आयुक्तांनी गुन्हा तातडीने उघड करण्याचे निर्देश दिले होते. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेने चार स्वतंत्र पथके तयार करून तपास सुरू केला.

अमरावती शहर व ग्रामीण भागातील बेपत्ता महिलांची माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीदारांच्या मदतीने मृत तरुणीची ओळख काजल जितेंद्र इंगळे (वय २२, मूळ रा. विश्रोळी, ता. चांदूर बाजार, सध्या रा. तेजस विहार, राजुरा, अमरावती) अशी पटविण्यात आली. मात्र घटनास्थळ दुर्गम जंगल परिसरात असल्याने आणि परिसरात कोणतेही सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने तपासास मोठे आव्हान निर्माण झाले होते. तरीही गुन्हे शाखेच्या पथकाने अथक परिश्रम घेत घटनास्थळापासून दूरवरच्या विविध भागांतील ३०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित चेतन सुनिल थोरात (वय २३, रा. तेजस विहार, राजुरा, अमरावती) याला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मृतक तरुणी त्याची मावस बहीण असल्याचेही तपासात समोर आले आहे. आरोपीने खून केल्यानंतर तरुणीची ओळख पटू नये म्हणून मृतदेहावर पेट्रोल टाकून तो जाळला. तसेच मोबाईल व इतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने घटनास्थळावरून दूर फेकून दिल्याची माहितीही त्याने दिली. संबंधित वस्तू जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सीसीटीव्ही नसलेला दुर्गम जंगल परिसर, जळालेला मृतदेह आणि ओळख पटविण्यासाठी कोणताही ठोस पुरावा नसतानाही गुन्हे शाखेने तांत्रिक तपास, माहितीदारांचे जाळे आणि सातत्यपूर्ण शोधमोहीम यांच्या बळावर हा गुन्हा उघडकीस आणला. त्यामुळे या तपासाची शहरभर चर्चा होत आहे. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त श्याम घुगे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रमेश धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या युनिट-१ व युनिट-२च्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT