action on Talatha in Savangi
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून पैसे घेणाऱ्या तलाठ्याला निलंबित केले. File photo
अमरावती

अमरावती : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'साठी पैसे मागणारा तलाठी निलंबित

पुढारी वृत्तसेवा

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून पैसे घेणाऱ्या तलाठ्याला जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी मंगळवारी (दि.२) निलंबित केले आहे.

अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात येणाऱ्या सावंगी मधील तलाठी तुळशीराम कंठाळे हे लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांकरिता महिलांकडून प्रत्येकी 50 रुपये घेत होते. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्या व्हिडिओची तहसीलदारांमार्फत शहानिशा करून तलाठी तुळशीराम कंठाळे याला निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिली. आता या तलाठ्यावर फौजदारी कारवाई देखील केली जाणार आहे.

लाडकी बहीण योजना ही राज्याची महत्त्वकांक्षी योजना असून त्याकरिता लागणारे कागदपत्रे तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी आपल्या अधिनस्त प्रशासकीय यंत्रणेला दिले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी या योजनेला घेऊन विरोधक षडयंत्र करत असल्याचा आरोप केला होता. मात्र अमरावती जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण शहानिशा करून तलाठ्यावर पैसे घेतल्याप्रकरणी कारवाई केली आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभासाठी ग्रामीण भागातील महिलांना पैसे मागितले जात असल्याचे स्पष्ट होते आहे. योजना सुरू होताच लाभार्थ्यांची लूट केली जात आहे.

सेतू केंद्रांवर महिलांची मोठी गर्दी

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी योजना राज्याच्या अर्थसंकल्पात घोषित करण्यात आली. या योजनेसाठी 1 जुलै ते 15 जुलै पर्यंत अर्ज सादर करण्यासाठी कालावधी देण्यात आला आहे. मात्र या योजनेच्या दुसऱ्याच दिवशी अमरावती जिल्ह्यातील अनेक सेतू केंद्रांवर महिलांची मोठी गर्दी दिसून येत आहे. 15 जुलै शेवटची तारीख असल्याने गर्दी होत असून त्यामुळे तारीख वाढवून देण्याची मागणी महिला वर्गाकडून होत आहे.

SCROLL FOR NEXT