अमरावती, पुढारी वृत्तसेवा :
अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने गाढ झोपेत असलेल्या पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.२७) जिल्ह्यात घडली आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या कामनापूर येथील हा खळबळजनक प्रकार आहे. संशयीत आरोपी पतीचे नाव मधुकर नारायण कोतलाम (वय ६०) असे आहे. पोलिसांनी त्याला घटनास्थळावरून अटक केली आहे.
या विषयी मिळालेल्या माहितीनुसार, मृतक पत्नीचे दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध होते. ती गेल्या दोन आठवड्यापासून त्या व्यक्तीसोबतच राहत होती असे पतीचे म्हणणे आहे. अशातच ती घरी परतली असता तिने पती मधुकर कोतलाम याला तिच्या दुसऱ्या लग्ना संदर्भात सांगितले. यावरून दोघांमध्ये वादही झाला. गुरुवारी रात्री ती घरात गाढ झोपेत असताना पतीने अनैतिक संबंधाचा राग मनात धरून घरातील कुऱ्हाडीने पत्नीच्या मानेवर आणि डोक्यावर वार करून तिची हत्या केली. या घटनेनंतरही संशयीत आरोपी पती मृत पत्नीजवळच बसलेला होता.
तळेगाव दशासर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ठाणेदार रामेश्वर दांडगे हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. उपविभागीय अधिकारी आशित कांबळे यांनी देखील घटनास्थळी पोहोचून कारवाई संदर्भात योग्य ते निर्देश दिले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. पोलीस पाटील मीना चंद्रशेखर कडू यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयीत आरोपी पतीविरुद्ध गुन्हा नोंदविला असून त्याला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.