Yashomati Thakur vs Sanjay Khodke
अमरावती : अमरावती शहरामध्ये संजय खोडके यांची दादागिरी सुरू आहे. महापालिकेमध्ये त्यांना खाली जागा हडपायची होती. तसंच एपीएमसी ची देखील खुली जागा त्यांना हडपायची आहे. त्यांचे संपूर्ण लक्ष जागांवर असून त्यावरच दोन्ही नवरा बायको राजकारण करत आहेत, अशी टीका काँग्रेस नेत्या माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी (दि.२१) अमरावतीत केली.
शुक्रवारी कृषी मंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्याआधीच काही कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नजर कैदेत ठेवत ताब्यात घेतले. त्यामुळे माजी आमदार यशोमती ठाकूर चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. यावरून त्यांनी आमदार संजय खोडके यांच्यावर टीका करत त्यांची दादागिरी अमरावती शहरात सुरू असल्याचे सांगितले. संजय खोडकेंच्या सांगण्यावरूनच काँग्रेस कार्यकर्त्यांना नजर कैद ठेवल्यास आरोप त्यांनी केला.
कृषी मेळाव्याच्या अनुषंगाने कृषिमंत्री दत्तात्रय भरणे शुक्रवारी अमरावती दौऱ्यावर होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसकडून आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावरून यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या होत्या. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महासचिव संजय खोडके हे विधान परिषदेचे आमदार असून त्यांच्या पत्नी सुलभा खोडके यादेखील अमरावती मतदारसंघातून आमदार आहेत. त्यामुळे दोघांचीही शहरात दादागिरी सुरू आहे, अशा आशयाचे विधान यशोमती ठाकूर यांनी केले.
अमरावती महानगरपालिकेची अवस्था अतिशय खराब आहे. गुन्हेगारी वाढते आहे. शहराकडे लक्ष न देता आता एपीएमसी च्या जागेवर त्यांचं लक्ष आहे. म्हणून आमदार संजय खोडके तोडफोड करण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या. दरम्यान याचा व्हिडिओ ही सोशल मीडियावर वायरल करण्यात आला.
युवक काँग्रेसने दाखवले काळे झेंडे
दरम्यान या घटनाक्रमानंतर कृषी संकटाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत युवक काँग्रेसने कृषिमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत जोरदार निषेध केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आम्ही मौन राहणार नाही, आवाज उठवणारच, असा इशाराही यावेळी देण्यात आला.