गोव्यातील आलिशान निवासी संकुलावर धाड टाकत पोलिसांनी एका महिलेसह १२ आरोपींना अटक केली.  Pudhari
अमरावती

Amravati Crime | अमरावती पोलिसांकडून ऑनलाइन गेमिंग रॅकेटचा पर्दाफाश; गोव्यातून महिलेसह १२ जण अटकेत

आलिशान सोसायटीवर अमरावती ग्रामीण पोलिसांचा छापा

पुढारी वृत्तसेवा

Amravati Online Gaming Racket

अमरावती : अमरावती ग्रामीण पोलिसांनी आंतरराज्यीय स्तरावर कार्यरत असलेल्या सायबर फसवणूक आणि अवैध ऑनलाइन गेमिंग रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. दक्षिण गोव्यातील एका आलिशान निवासी संकुलावर धाड टाकत पोलिसांनी (दि.२३) एका महिलेसह १२ आरोपींना अटक केली. या कारवाईत सुमारे १० लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तपासात ६ कोटी २५ लाख रुपयांहून अधिकच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांचा उलगडा झाला आहे.

पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार, जिल्ह्यातील गरीब व मजूर वर्गातील नागरिकांना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्या नावावर बँक खाती उघडण्यात येत होती. त्यानंतर संबंधितांकडून एटीएम कार्ड, पासबुक आणि बँक खात्याशी संलग्न मोबाईल सिमकार्ड ताब्यात घेतले जात होते. या खात्यांचा वापर देश-विदेशातील ऑनलाइन गेमिंग, सायबर फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहारांमधील पैशांच्या देवाणघेवाणीसाठी करण्यात येत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.

याप्रकरणी शिरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सायबर पोलिसांच्या तांत्रिक तपासादरम्यान आरोपींचा माग काढण्यात आला. तपासाची सूत्रे दक्षिण गोव्यातील प्रोव्हिडंट अडोरा या आलिशान निवासी संकुलापर्यंत पोहोचली. त्यानंतर अमरावती ग्रामीण पोलिसांच्या तीन विशेष पथकांनी तेथे सापळा रचून छापा टाकला आणि १२ आरोपींना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये देवचंद मेश्राम, प्रेम खिलारे, अनिकेत मस्के, योगेश इरपाते, प्रीतम इंगळे, आशीषकुमार चौरसिया, सत्यम मौर्या, शुभम झारिया, वैभव सूर्यवंशी, आदित्य माळी, सुशील बर्मन यांच्यासह एका महिला आरोपीचा समावेश आहे. दरम्यान, अमरावतीचा रहिवासी राकेशकुमार झामनानी याच्यासह आणखी दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम व अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक लांडे, विलासकुमार सानप, अमोल पुरी, संतोष गुर्जर, सुनील बनसोड, प्रवीण वानखडे, पंकज गोळीईतकर, प्रवीण आंबाडकर, रितेश गोस्वामी, अजित राठोड, संदीप जुगनाके, पवन ढोके, अंकित अढाऊ, मयूर नरोकार, आशीष मुडें, सुमित चव्हाण, रोशन आठवले, सरिता चौधरी, रुपाली इंगोले, पूनम कान्होलीकर, कल्पना सोनोत्रे, आचल मेटे आणि योगिता शेळके यांनी पार पाडली.

६४ बँक खाती गोठविली

छाप्यामध्ये पोलिसांनी आरोपींकडून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक व बँकिंग साहित्य जप्त केले. यात १९८ सिमकार्ड, १४७ एटीएम कार्ड, ६४ बँक पासबुक, १९ चेकबुक, ५२ मोबाईल फोन, ९ लॅपटॉप आणि ३ टॅबलेट यांचा समावेश आहे. तपासात या ६४ बँक खात्यांमधून तब्बल ६ कोटी २५ लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचे समोर आले. या सर्व खात्यांवर तात्काळ स्थगिती आणण्यात आली असून, देशातील विविध राज्यांमधून या खात्यांविरोधात ऑनलाइन तक्रारी नोंद असल्याचेही उघड झाले आहे.

नागरिकांनी सावध राहावे : एसपी कदम

पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, अल्प आर्थिक मोबदल्याच्या आमिषाला बळी पडून कोणालाही आपले बँक खाते, एटीएम कार्ड, आधार कार्ड किंवा मोबाईल क्रमांक वापरण्यास देऊ नये. कोणत्याही परिस्थितीत ओटीपी शेअर करू नये. अशा खात्यांचा वापर ऑनलाइन गेमिंग, शेअर ट्रेडिंग, ‘डिजिटल अरेस्ट’सारख्या सायबर गुन्ह्यांमधील पैशांच्या व्यवहारासाठी केला जातो. जर कोणी आपले खाते इतरांच्या वापरासाठी दिले असेल, तर ते त्वरित परत घेऊन सायबर हेल्पलाइनकडे माहिती द्यावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT