अमरावती

Amravati News : यशोमती ठाकूर यांच्या घरावर ड्रोनद्वारे नजर? परिसरात खळबळ; तक्रार दाखल

हेरगिरी की चित्रीकरण? संशयित ड्रोन चालकाचा शोध सुरू; गाडगेनगर पोलिसांकडून चौकशीला वेग

पुढारी वृत्तसेवा

अमरावती : गणेडीवाल लेआउट परिसरातील माजी पालकमंत्री तथा काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानाच्या परिसरात ड्रोन कॅमेरा फिरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, त्यांनी अमरावतीत गाडगेनगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. हा ड्रोन कोण उडवत होता आणि तो तेथे कोणत्या कारणासाठी फिरवण्यात आला, याची चौकशी करण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.

ठाकूर यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या निवासस्थानाच्या परिसरात ड्रोन कॅमेरा घिरट्या घालताना आढळला. ड्रोनद्वारे घराचे चित्रीकरण अथवा परिसरावर लक्ष ठेवले जात असल्याची शक्यता त्यांनी तक्रारीत व्यक्त केली आहे. त्यामुळे या प्रकाराची माहिती घेऊन संबंधित व्यक्तीचा शोध घेण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली.

तक्रार प्राप्त झाल्यानंतर गाडगेनगर पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. ड्रोन नेमका कोणत्या दिशेने आला, तो कुठे उतरवण्यात किंवा नियंत्रित करण्यात आला, त्याचे संचालन कोणी केले आणि त्याद्वारे कोणतेही चित्रीकरण झाले का, याबाबत पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे. परिसरातील उपलब्ध माहितीच्या आधारे तसेच प्रत्यक्षदर्शींचीही चौकशी केली जात आहे.

ड्रोनच्या हालचालींबाबत काही दृश्य किंवा अन्य पुरावे उपलब्ध आहेत का, याचीही तपासणी केली जात आहे. तक्रार प्राप्त झाली असून ड्रोन कुठून आला आणि तो कोणी उडवला, याबाबत चौकशी सुरू असल्याचे गाडगेनगरचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ड्रोन उडवण्यामागील नेमका उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही; पोलिसांच्या चौकशीतून ड्रोन चालकाची ओळख आणि त्यामागील कारण समोर आल्यानंतरच या प्रकरणाचे नेमके स्वरूप स्पष्ट होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT