

अमरावती : मेळघाटातील गिरगुटी गावात कोणतीही पूर्वपरवानगी आणि आवश्यक वैद्यकीय पात्रता नसताना शिबिराच्या नावाखाली रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरांचा आरोग्य विभागाने पर्दाफाश केला. धक्कादायक बाब म्हणजे, हे शिबिर चक्क जिल्हा परिषदेच्या शाळेत भरवण्यात आले होते. याप्रकरणी आरोग्य विभागाने चिखलदरा पोलिसांत तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली आहे.
गिरगुटी येथे बेकायदा वैद्यकीय व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर वैद्यकीय अधिकारी व आरोग्य विभागाच्या पथकाने प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली. या तपासणीदरम्यान संबंधित व्यक्तीकडे केवळ एका आयुर्वेदिक हेल्थकेअरचा परवाना असल्याचे आढळून आले. मात्र, या परवान्याच्या आधारे प्रत्यक्ष रुग्णांवर ॲलोपॅथिक किंवा वैद्यकीय उपचार करण्याचा अधिकार संबंधितांना नसतानाही हे उपचार सुरू असल्याचे समोर आले. शिवाय, ही व्यक्ती गावात वैद्यकीय व्यवसाय थाटून उपचाराच्या नावाखाली रुग्णांकडून ८०० ते १ हजार रुपये शुल्क उकळत असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तसेच रुग्णांची तपासणी करण्यासाठी एका मशिनचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. या मशिनद्वारे रुग्णांची तपासणी करून उपचार केले जात असल्याचा आरोप आहे. संशयिताकडे आवश्यक वैद्यकीय पदवी, पात्रता व अधिकृत नोंदणी नसतानाही रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याने आरोग्य विभागाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. कारवाईदरम्यान आरोग्य विभागाने घटनास्थळावरून काही संशयास्पद औषधे जप्त केली आहेत.
याप्रकरणी बुधवारी (२३ सप्टेंबर) चिखलदरा पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली. ही कारवाई अमरावतीचे जिल्हा आरोग्य अधिकारी प्रवीण पारिसे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिषेक नायडू, डॉ. लोखंडे, रोहन गीते, सलोनी नायर, गजानन सुने, विनोद चव्हाण, मुकुंद गिरी, रवींद्र बेलसरे आणि दिलीप चर्जन यांच्या पथकाने केली. आता या प्रकरणात आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन नेमकी काय कायदेशीर कारवाई करते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.