Newborn Sold In Amravati
अमरावती: अमरावती शहरात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने जन्म दिलेल्या नवजात बाळाला साडेतीन लाख रुपयांत विकण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी राजापेठ परिसरातील महिला डॉक्टर, तिचा पती, अल्पवयीन प्रियकर आणि बाळ खरेदी करणाऱ्या दांपत्याविरुद्ध फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर नातेवाइकांनी उपचारासाठी तिला डॉक्टर भोजने यांच्या रुग्णालयात नेले होते. १५ ऑक्टोबर रोजी या अल्पवयीन मुलीने एका मुलीला जन्म दिला. प्रसूतीनंतर डॉक्टरने बाळ अनाथालयात देण्याचे सांगून कायदेशीर नियम डावलून एका श्रीमंत दांपत्याशी साडेतीन लाख रुपयांचा सौदा ठरवला होता.
दरम्यान, सामाजिक महिला संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना या अवैध प्रकाराची कुणकुण लागताच त्यांनी रुग्णालयात जाऊन जाब विचारला आणि पोलिसांना याची माहिती दिली. हा प्रकार समोर येताच डॉक्टर दांपत्य रुग्णालय बंद करून फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी नवजात बालकाला सुरक्षित त्यााब्यात घेतले असून या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे.
पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या प्रियकराने तिचे शोषण केले होते. गरोदर राहिल्यानंतर बदनामीच्या भयापोटी नातेवाइकांनी १५ ऑक्टोबर रोजी राजापेठ परिसरातील एका खासगी रुग्णालयात तिची प्रसूती केली. प्रसूतीनंतर मुलीला अनाथालयात देण्याचे आश्वासन डॉक्टरने दिले होते, मात्र त्यांनी कायदेशीर नियम डावलून दुसऱ्या एका दांपत्यासोबत साडेतीन लाख रुपयांत या मुलीचा सौदा केला.
रविवारी उशिरा नवजात बाळाच्या कथित विक्रीसंदर्भातील एक ऑडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. या ऑडिओमध्ये कथित महिला डॉक्टर मुलीसाठी साडेतीन लाख रुपये, तर मुलासाठी एक लाख रुपये मागत असल्याचे ऐकू येत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, हा ऑडिओ अमरावती शहरातीलच आहे का, तसेच त्यातील संभाषणाची सत्यता काय आहे, याबाबत प्रशासनाकडून अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. त्यामुळे ऑडिओची सत्यता आणि या प्रकरणाशी त्याचा संबंध तपासातून स्पष्ट होणार आहे.