Amaravati Crime Neelima Kharbade Case
अमरावती : शहरातील संताजी नगर येथील नीलिमा उर्फ पिंकी खरबडे हत्याकांडाचा अखेर उलगडा झाला असून, गुन्हे शाखा पोलिसांनी तिचा दुसरा पती नितीन सुरेश इंगोले (वय ३२, अशोक कॉलनी, मोर्शी रोड, अमरावती) याला अटक केली आहे. नितीनच्या इच्छेविरुद्ध दोघांचे कोर्ट मॅरेज झाले होते. त्यानंतर नीलिमा त्याला सतत आपल्या घरी राहण्यासाठी तगादा लावत होती. यामुळे त्रस्त झालेल्या नितीनने तिची निर्घृण हत्या केल्याचे उघड झाले आहे.
३० नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजता नीलिमा उर्फ पिंकी संजय खरबडे हिचा मृतदेह तिच्याच घरात आढळला. सुरुवातीला अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केल्याचा संशय होता. राजापेठ पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. प्रकरण गंभीर असल्यामुळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. तपासात ठोस पुरावे न मिळाल्याने पोलिसांसमोर हे प्रकरण आव्हानात्मक होते. सततची तांत्रिक तपासणी, माहितीदारांमार्फत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर संशयित नितीन इंगोलेला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली.
ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, उपायुक्त शाम घुगे, गणेश शिंदे, रमेश धुमाळ व सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पथकात इमरान नायकवडे, अनिकेत कासार (सायबर), प्रियंका कोटावार (सायबर), गजानन सोनूने, दीपक सुंदरकर, सचिन बहाळे, जहीर शेख, संग्राम भोजने, अतुल संभे, सूरज चव्हाण, निखिल गेडाम, योगेश पवार, राजीक रायलीवाले, नरेश मोहरील, प्रभात पोकले, संदीप खंडारे, राहुल दुधे, सुषमा आठवले यांचा समावेश होता.
एक वर्षापासून दोघांची ओळख होती व त्यातून प्रेमसंबंध निर्माण झाले. नितीन हा शासकीय सेवेत असल्यामुळे त्यांच्यात नेहमी वाद व्हायचे. दोन महिन्यांपूर्वी दोघांनी कोर्ट मॅरेज केले, परंतु हा विवाह नितीनच्या इच्छेविरुद्ध होता. नीलिमा त्याच्यावर सतत ‘माझ्या घरी राहायला चल’ असा तगादा लावीत होती. या कारणावरून दोघांमध्ये वाद वाढत गेले.
हत्या करून नितीन घटनास्थळावरून खल, चाकू आणि घरातील सीसीटीव्हीचा डीवीआर घेऊन गेला. नंतर त्याने आपल्या एका मित्राशी संपर्क साधून ‘डिलीट केलेला डीवीआर डाटा रिस्टोर होईल का?’ अशी चौकशी केली. दरम्यान, त्याच्या मित्राला नीलिमाच्या हत्येत नितीन संशयित असल्याचे कळले. त्याने तत्काळ ही माहिती गुन्हे शाखेला दिली. त्यानंतर नितीनला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली आणि त्याने सत्य कबूल केले.
प्रथम चौकशी करताना नितीनने ‘मी घरीच होतो’ असे सांगितले. मात्र त्याच्या भावाकडून माहिती मिळाली की तो त्या दिवशी ४.३० नंतर घरी नव्हता. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर अधिक संशय आला.
त्या रात्री नीलिमाने बिअर तर नितीनने रमचे सेवन केले. उशिरा नितीनची झोप मोडली आणि पुन्हा नीलिमा त्याला सोबत राहण्याबद्दल बोलत राहिली. चिडलेल्या नितीनने प्रथम खलाने तिच्या डोक्यावर ३–४ वार केले, त्यानंतर चाकूने गळ्यावर वार करून हत्या केली. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने भिंतीवर आक्षेपार्ह लिखाणही केले. मात्र, अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.