Amravati Nagpur Highway
अमरावती : अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील सावर्डी नजीक धावत्या बसला रविवारी दुपारी अचानक आग लागल्याची थरारक घटना घडली आहे. बसने पेट घेतल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी प्रसंगावधान राखत तात्काळ बसमधून उड्या मारून बाहेर पडत आपले प्राण वाचवले. या अपघातात सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नसून मोठा अनर्थ टळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती-नागपूर मार्गावरून ही बस प्रवाशांना घेऊन जात असताना सावर्डी परिसरात बसला अचानक आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि बसमध्ये धूर पसरू लागला. जीवाच्या आकांताने प्रवाशांनी बसमधून उड्या मारून सुरक्षित स्थळी धाव घेतली. प्रवाशांच्या सतर्कतेमुळे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
दरम्यान, ही बस नेमकी कोणत्या आगाराची (डेपोची) होती आणि आग लागण्याचे नेमके कारण काय, याची अधिकृत माहिती वृत्त लिहीपर्यंत प्राप्त होऊ शकली नव्हती. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता.